ब्युरोतर्फे अलीकडेच २०१५मधील गुन्हेगारीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यात चोरीला गेलेला मुद्देमाल आणि त्यापैकी परत मिळविलेला मुद्देमाल याची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी तो परत मिळविण्याची टक्केवारी ही सार्वजनिक वाहनांच्या (बसेस) बाबतीत सगळ्यात जास्त आहे. देशात २०१५ मध्ये एकूण १२१ बसेस चोरीला गेल्या होत्या. त्यातील तब्बल ६६ बसेस म्हणजेच ५४.५ टक्के बसेस परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच चोरीच्या मुद्देमालाच्या संपत्तीच्या टक्केवारीचा विचार केल्यास पोलिसांना या प्रकरणांमध्ये ५१.३ टक्के यश प्राप्त झाले आहे. गुरांच्या चोरीचा विचार केल्यास देशात वर्षभरात एकूण ८८१५ गुरांची चोरी झाली. यात गायी, बैल, म्हैस अशा गुरांचा समावेश आहे. यातील एकूण ४१४४ म्हणजेच ४७ टक्के गुरे परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. मुद्देमालाच्या दृष्टिकोनातून देशातील सुमारे ३.५ कोटी रुपयांची गुरे चोरीला गेली. यातील एकूण १.६ कोटी रुपयांची गुरे (४६.२ टक्के) पोलिसांनी परत मिळविली आहेत.
तपासात महाराष्ट्र नापास
चोरीला गेलेल्या मालाचा तपास करून तो परत मिळविण्यात महाराष्ट्र पोलिसांनी नापासांच्या यादीत स्थान प्राप्त केले आहे. देशात चोरीचा माल परत मिळविण्यात तामिळनाडू पोलिसांनी आघाडी घेतली आहे. या राज्यात सुमारे १३१ कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. त्यातील सुमारे ८५ कोटी रुपयांचा मुद्देमाल म्हणजेच ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी परत मिळविला आहे. या टक्केवारीच्या यादीत त्रिपुराचा (१.५टक्के) शेवटचा क्रमांक लागतो. त्यानंतर महाराष्ट्राला क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील पोलिसांना केवळ ५.१ टक्के मुद्देमाल परत मिळविण्यात यश आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट