वंचितांच्या विकासासाठी केंद्र सरकारने सुगम्य भारत ही योजना आखली आहे. याअंतर्गत राज्य सरकार दिव्यांग बांधवांसाठी इन्टरव्हेन्शन केंद्र सुरू करेल. हे केंद्र येत्या तीन वर्षांत राज्याला दिव्यांगमुक्तीचा संकल्प करून मिशन हाती घेईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.
अपंग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय मंत्रालय, महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र आणि भगवान महावीर विकलांग सेवा समिती जयपूरच्यावतीने दिव्यांग बांधवांना मोफत साधन साहित्य वाटप शिबिराचे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पद्मभूषण डॉ. आर. मेहता, प्रेम भंडारी, एसएसबीसी बॅँकेच्या अलोका मुजुमदार प्रामुख्याने उपस्थित होते.
दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील दोन हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांची परावलंबित्वाच्या जोखडातून मुक्ती करून त्यांना स्वावलंबी बनविले जाणार आहे. औपचारिक उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी जयपूर फूटपासून ते कॅलिपर्स, स्प्लिंट, कुबड्या, श्रवणयंत्र, डेझीप्लेअर यांसारखे साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
दिव्यांग बांधवाच्या पुनर्वसनासाठी जयपूर फूट्स करीत असलेले काम मेक इन इंडियाचा आवाज बुलंद करणारे आहे, असे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आपणही इतरांप्रमाणे चालू, धावू शकतो हा आत्मविश्वास दिव्यांग बांधवांमध्ये निर्माण होत आहे. आतापर्यंत २५ हजारांहून अधिक दिव्यांग या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. आगामी तीन वर्षांत राज्यात स्पेशल सेल सुरू करून दिव्यांग मुक्तीचे मिशन हाती घेतले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या देशांतील पाच तीर्थांच्या विकासाचा संकल्प केला आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, दादर या दोन तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य दिव्यांग मुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन पूजा सिंग, दिनेश मासोदकर यांनी केले तर आभार मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.
जवानांसाठीही मदत
तत्पूर्वी सेवा समितीची भूमिका मांडताना पद्मभूषण डॉ. मेहता म्हणाले, ‘आम्ही आतापर्यंत अडीच लाख लोकांची अपंगत्वाच्या जोखडातून मुक्ती केली आहे. जयपूर येथे रोज २०० दिव्यांग बांधव स्वावलंबी बनतात. जगातील २७ देशांमध्ये १६१ शिबिराच्या माध्यमातून लाखो अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे.’ अमेरिकेत व्यास्तव्य करीत असलेले भंडारी म्हणाले, ‘सीमेवर शत्रूंशी लढताना अवयव गमावून बसलेल्या जवानांसाठीदेखील जयपूर फूट्स लवकरच मोफत कृत्रिम अवयव वितरित करेल.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट