‘जे झाले ते सर्व विसरून जा, मरणानंतर तीन दिवसांतच विधी आटोपून कामाला लागा. नवीन जीवनाला सुरुवात करा’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून कुर्यवंशी दाम्पत्याने फुटाळा तलावात आत्महत्या केली. त्यांच्या इच्छेनुसार, मुलांनी आपल्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे तीनच दिवसांत त्यांचा अंत्यसंस्कार आटोपला. पण, बीसीचे पैसे अद्याप द्यायचेच आहेत. हे पैसे कोण देणार, हा सवाल आता उपस्थित होतो आहे.
या घटनेने पोलिसांसह समाजमन सुन्न झाले आहे. हृदयाला पाझर फोडणारी ही घटना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. दिनेश कुर्यवंशी (५०) व योगिता कुर्यवंशी (४५, दोन्ही रा. गुप्ता चौक, सुरेंद्रगड) अशी मृतांची नावे आहेत. दिनेश यांचा फ्रेण्ड्स कॉलनी परिसरात पानठेला आहे. योगिता या कमला टिफिन सर्व्हिस या नावाने डबे पोहोचवीत होत्या. कुर्यवंशी दाम्पत्याला अमर ऊर्फ सोनू (२१) व अनंत ऊर्फ मोनू (१८) ही दोन मुले आहेत. अमर हा इंजिनीअरिंगच्या अंतिम तर अनंत हा इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाला आहे. योगिता या तीन वर्षांपासून बीसी चालवीत होत्या. भिसीचे सुमारे साडेचारशे सदस्य होते. महिन्याला २५ लाखांची बीसी होती. यावर्षी काहींनी पैसे दिले नाहीत. सदस्य योगिता यांना पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे योगिता या तणावात होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बीसी आणि पैशांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु, त्यांच्या बीसीत अनेकांचे पैसे अडकले होते, अशी माहिती या परिसरातील रहिवाशांनी दिली.
सदस्यांकडे लेखी नोंदी
या बीसीतील काही सदस्यांकडे पैशांच्या लेखी नोंदी आहेत. परंतु, अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.
पैसे कमवू की परीक्षा देऊ?
परवापासून अनंतची परीक्षा सुरू झाली आहे. या घटनेनंतर त्याला परीक्षा देता आली नाही. परंतु, उद्यापासून आपण त्याला परीक्षेकरिता पाठविणार असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. या घटनेनंतर या दोन्ही मुलांवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. जीवन जगण्याकरिता पैसा कमवू की कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करू, असा प्रश्न या दोघांसमोर उभा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट