म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर
जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी कार्यरत बोगस डॉक्टरांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याविरोधात धडक मोहीम राबवित दहा बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्हास्तरावर बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पथके निर्माण करण्यात आली आहेत. बोगस डॉक्टर आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध त्या पथकाद्वारे कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. याअंतर्गत बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सदर पथकांद्वारा विविध ठिकाणच्या बोगस डॉक्टरांवर धाडी टाकण्यात आल्या असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही बोगस डॉक्टरांची शोध मोहीम सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. बोगस डॉक्टरांविरुद्ध संबधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी दिली. याबरोबरच नागरिकांनी अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
तीन महिलांचा बळी
राज्याच्या सीमावर्ती भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून एका बोगस डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्याने तीन महिलांचा बळी गेल्याची घटना राजुरा तालुक्यातील लक्कडकोट होती.
कुठे किती?
चंद्रपूर : ०२
भद्रावती : ०१
चिमूर : ०१
मूल : ०१
सिंदेवाही : ०१
गोंडपिपरी : ०१
राजुरा : ०१
कोरपना : ०२
...............
एकूण : १०
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट