फ्रान्समधून सुरू झालेली ब्रेव्हे ही साहसी सायकल स्पर्धा विदर्भातील क्रीडा विश्वास नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यात शनिवारी देशातील आणखी एका विक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी नागपूरला मिळाली आहे. एकाच वर्षात २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचा साहसी सायकल प्रवास केल्यानंतर सुपर रॉँदेनियर्सचा किताब मिळतो. एकाच वर्षात सहाव्यांदा असे साहस करीत विक्रमाला गवसणी घालण्याची जिद्द मनाशी बाळगत हैदराबाद येथील साई रामा कृष्णा शनिवारी नागपुरात येणार आहे. अशा प्रकारचा पराक्रम करणारा तो देशातील पहिला साहसी सायकलपटू ठरणार आहे.
यापूर्वी त्याने चालू वर्षांत पाचवेळा असा पराक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. यावर्षातील केवळ ६०० किलोमीटरची ब्रेव्हे शिल्लक राहिल्याने त्यांनी नागपूरची निवड केली. या ब्रेव्हेत सहभागी होण्यासाठी साई रामा कृष्णा नागपुरात दाखल झाला आहे. ऑडेक्स इंडिया आणि नागपूर रॉँदेनियर्सच्यावतीने शनिवारी ६०० किलोमीटर साहसी सायकल स्पर्धेला शनिवारी पहाटे ५ वाजता झिरो माईल येथून सुरुवात होणार आहे. नागपूर, अमरावती, कारंजा, मंगरूळपीर, वाशीम, मालेगांव आणि परत याच मार्गाने नागपूर असा ६०० कि. मी. चा साहसी सायकल प्रवासाचा टप्पा तो ४० तासांच्या नियोजित वेळेत गाठणार आहे. साई रामा कृष्णा याने हे अंतर नियोजित वेळेत पूर्ण केल्यास एकाच वर्षात सहाव्यांदा सुपर रॉँदेनियर्स असा किताब पटकावणारा तो देशातील पहिला साहसी सायकलपटू ठरणार आहे. ऑडेक्स इंडियाच्या समन्वयक दिव्या ताते यांनीदेखील या भारतीय विक्रमाला दुजोरा दिला आहे.
सोबतच या साहसी सायकल स्पर्धेसाठी आणखी १७ स्पर्धकही आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची परीक्षा देणार आहेत. यात वाशीम येथील दोन, वर्धेतील तीन आणि उर्वरित १० स्पर्धक नागपुरातून सहभागी होणार आहेत. आयकर विभागाचे आयुक्त राजीव रानडे या साहसी सायकल स्पर्धकांना सकाळी ५.३० वाजता हिरवी झेंडी दाखवणार आहेत. विशेष म्हणजे, रानडे हे स्वतः राष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक आणि खेळाडू आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ते सायकलने येणार आहेत.
डॉ. आर्यादेखील नोंदविणार विक्रम
सहाशे किलोमीटरच्या साहसी सायकल स्पर्धेसह रविवारी दोनशे किलोमीटर अंतराची ब्रेव्हे होणार आहे. त्यात डॉ. भूपेंद्र आर्या हे ज्येष्ठ नागरिक पुन्हा एकदा आपल्या शारीरिक, मानसिक क्षमता तपासणार आहेत. वयाची चौऱ्याहात्तरी गाठलेल्या डॉ. आर्या यांनी यापूर्वीही सर्वांत ज्येष्ठ साहसी सायकलपटू म्हणून नागपुरातून विक्रम नोंदविला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट