म. टा. प्रतिनिधी, वर्धा
चेन्नई येथून छत्तीसगडकडे कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधील वायरिंग शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. शहराबाहेरुन जाणाऱ्या बायपास मार्गावरील कारला चौक परिसरात रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून चालक व क्लीनर थोडक्यात बचावले.
चालक अवधेशकुमार पाल व क्लीनर सोनू पाल (रा. अलाहाबाद) हे कंटेनरमधून नऊ कार घेऊन चेन्नई येथून छत्तीसगडमधील कोटंबा येथे जात होते. नागपूरकडे जात असताना कारला चौकात अवधेशकुमार यांना कंटेनरमधील वायरिंग जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी कंटेनर थांबवून केबिनमधून उडी घेतली. काही वेळातच कंटेनरने पेट घेतले. याविषयीची माहिती पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन दलाने आग विझविण्यास सुरुवात करण्यापर्यंतच केबीन व सर्व चाके जळून खाक झाली होती.
वाहतूक खोळंबली
रस्त्याच्या मधोमध कंटेनरने पेट घेतल्याने बायपास मार्गावरील वाहतूक काळी वेळ बंद करण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने तब्बल दोन तास वाहतूक खोळंबल्याने त्रास सहन करावा लागला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट