‘बेरोजगार अभियंत्यांनी नोकऱ्याच्या मागे न लागता व्यावसायिक बनून इतरांना नोकऱ्या देणारे बनले पाहिजे. ऊर्जा क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची कामे करायची आहेत. या माध्यमातून बेरोजगार अभियंता यशस्वी व्यावसायिक बनला पाहिजे, यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे’, असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. बेरोजगार अभियंत्यांना रोजगार मिळावा म्हणून ऊर्जामंत्र्यांनी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे पदवी व पदविकाधारक विद्युत अभियंत्यांकरिता मार्गदगर्शक मेळाव्याचे आयोजन बिजलीनगर विश्रामगृह येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात ऊर्जामंत्री मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक आर. बी. गोयनका, महावितरणचे क्षेत्रीय संचालक प्रसाद रेशमे, विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे, विद्युत निरीक्षक उमाकांत धोटे आदी
उपस्थित होते.
ऊर्जामंत्री म्हणाले, ‘विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पालकमंत्री असतांना त्यांनी बेरोजगार अभियंत्यांनी व्यावसायिक, कंत्राटदार व्हावे, यासाठी चांगले पाऊल उचलले होते. अनेक अभियंत्यांना त्यांनी कामे दिलीत. त्यातून सिव्हिलचे काम करणारा चांगला कंत्राटदार वर्ग निर्माण झाला. आपणही त्याच पावलावर पाऊल टाकत बेरोजगार अभियंत्यांना कामे देऊन त्यांना यशस्वी व्यावसायिक, कंत्राटदार बनविणार आहोत. त्यासाठी शासनाकडून लागणारी सर्व मदत त्यांना दिली
जाणार आहे.’
ऊर्जा क्षेत्रात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे आहे. त्यासाठी चांगले काम करणाऱ्या कंत्राटदारांची शासनाला आवश्यकता आहे. कोणत्याही बेरोजगार अभियंत्याला संधी दिल्याशिवाय त्याच्यातील कौशल्यगुणांना वाव मिळणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली असून त्यांनी बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्यास मान्यता दिली असल्याचे बावनकुळे म्हणाले. पूर्वी हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभागात होता. आता मात्र आम्ही तो ऊर्जा विभागाशी जोडला आहे. बेरोजगार अभियंत्यांच्या अनुभवाचा काळ आता तीन महिन्यांचाच केला आहे. जिल्हा नियोजन समितीतून आम्ही नागपूर जिल्ह्याला ४० कोटींचा निधी दिला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. या निधीची कामे बेरोजगार अभियंत्यांनाच द्यावीत, असे निर्देशही त्यांनी आपल्या भाषणातून दिले. फक्त अभियंत्यांनी चांगल्या दर्जाची कामे करावीत, अशी अपेक्षाही ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते बेरोजगार अभियंत्यांसाठी एका माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बेरोजगार अभियंत्यांना प्रमाणपत्रेही वितरित करण्यात आलीत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट