वर्धा शहरातील १५५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आर्वी नाका परिसरात जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, उपस्थित होते. जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती असणारे, १२ वर्षे महात्मा गांधींचे कार्यक्षेत्र राहिलेले, जगाला अहिंसेचा मंत्र देणारे, जमिनीचे भूदान आणि कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे शहर म्हणून वर्धा शहराची ओळख आहे. पण, विकासाच्या शर्यतीत मात्र हे शहर मागे राहिले. या शासनाने वर्धा शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे. वर्धा हे भारतात सर्वाना अभिमान वाटेल आणि आवडेल असे शहर निर्माण करणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पुढील तीन वर्षात वर्धा जिल्ह्यासाठी १२३० कोटी रुपयांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात २ लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू केली. यात वर्धा शहरात रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारिकरणाचे काम होत आहे. जनतेने या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करून वर्धा शहरासाठी १०० कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट