मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे पैसेवाल्यांचे असल्याचे विधान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. त्यावर आक्षेप घेतले जात आहेत. पण, असे मोर्चे वाहन सुविधांच्या मुबलकतेमुळे होतात. त्यामुळे बडोले जे बोलले ती वस्तुस्थिती आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
चंद्रपुरात रविवारी दीक्षाभूमीवर साठावा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा झाला. यानिमित्त शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, दलित-मराठा संघर्ष महाराष्ट्राला परवडणारा नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा आरक्षण हे केवळ संविधानाच्या माध्यमातूनच देता येणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी घटनेत तसा बदल करावा लागणार असून, त्यास आमची तयारी आहे. तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करावी, त्यातील एससी, एसटी ओबीसी यांचे ५० टक्के आरक्षण वगळून उर्वरित २५ टक्के आरक्षण हे मराठा समाज (१६ टक्के) व इतर अल्पसंख्यांकांना (९ टक्के) दिले जावे. भाजपा-शिवसेनेने एकमेकांवर कुरघोडी न करता आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात व आरपीआयला सोबत घ्यावे, असेही ते म्हणाले. दलित आणि मराठा या जातीत कटुता येऊ नये यासाठी आपण पुढाकार घेत दलित-मराठा ऐक्य परिषद आयोजित केली आहे. येत्या ११ नोंव्हेबर रोजी ती कोल्हापुरात होणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट