राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या प्राधिकारणींवर कुलपती व कुलगुरू तसेच शासन नामित सदस्यांच्या नेमणुकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे त्या रिक्त पदांवर आता कुणाची वर्णी लागणार, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्य सरकारने प्राधिकारणींच्या विविध प्रवर्गातील निवडणुकांना आणखीन एका वर्षाकरिता मुदतवाढ दिली आहे. नवीन कायदा लागू होईपर्यंत केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याच हातात विद्यापीठ प्रशासन राहणार होते. परंतु, आता सिनेट, व्यवस्थापन परिषद विद्वत परिषद, परीक्षा मंडळ, अभ्यास मंडळे आणि इतर प्राधिकारणींवर कुलपती, कुलगुरू व शासन नामित सदस्य नियुक्त करण्याची परवानगी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील कुलगुरूंना गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत दिली होती. परंतु, त्यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत आदेश काढण्यात आले नव्हते. परिणामी, नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. त्यातच काही विद्यापीठांना दीक्षांत समारंभदेखील घ्यावयाचा आहे. त्या समारंभात अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषद सदस्य यांनाच व्यासपीठवर बसण्याचा मान दिल्या जातो. प्राधिकारणी नसल्याने दीक्षांत समारंभात पदवीदान कसे होणार, असा प्रश्नही निर्माण झाला होता.
दरम्यान, राज्य सरकारने राजपत्र काढून विद्यापीठांना नामित सदस्य नियुक्त करण्याची परवानागी दिली आहे. त्यामुळे आता विविध प्राधिकारणींवर शिक्षक, प्राचार्य, शिक्षणतज्ञ, समाजिक क्षेत्र, उद्योग व व्यवसाय यासारख्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना नामनिर्देशनाने नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी कुलगुरू आता नेमक्या कोणत्या गटातील व्यक्तींना प्राधान्य देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर विद्यापीठात सध्या सेक्युलर पॅनलचाच दबदबा आहे. कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव, बीसीयुडी संचालक आणि वित्त अधिकारी अशी पदांलर केवळ त्याच गटातील व्यक्तींची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात विद्यापीठात एकांगी कारभार चालवण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला होता.तसेच त्यावरून वादही निर्माण झाले होते. त्यामुळे कुलगुरू डॉ. काणे यांनी समन्वयकांची नियुक्ती करीत असताना सर्व गटातील व्यक्तींना स्थान देण्याचा प्रयत्न केला. तशाच प्रकारे आता नामनिर्देशन करीत असताना शिक्षण मंच, नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन आणि यंग टीचर्स असोसिएशन यासारख्या संघटनांतील व्यक्तींनाही स्थान मिळेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट