इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते घरातील साध्या साध्या वस्तूंमध्येही चिनी बनावटीच्या वस्तूंनी आपले स्थान निर्माण केले आहे. स्वस्त मिळते म्हणून ग्राहकांची पसंतीही या मालाला मिळू लागली आहे. मात्र, देशाच्या सुरक्षेचे मुद्दे उपस्थित करीत व स्वदेशीबाबत लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण करत ‘मेड इन चायना’ला विरोध होऊ लागला आहे. असे चित्र उभे केले जात असताना महाराष्ट्र शासनाने चीनसोबत मेट्रो रेल्वेचे डब्बे बनविण्याचा करार कसा केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चीन हा कायम विश्वासघात करणारा व भारताला पाण्यात पाहणारा देश समजला जातो. पाकिस्तानपेक्षाही भारताला अधिक धोका चीनकडून असल्याचे बोलले जाते. अशावेळी चिनी कंपनीने मेट्रो रेल्वेच्या डब्यांसाठी नागपुरात गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. ही कंपनी भारतात गुंतवणूक करून येथील डेटा चोरी करू शकते. यामुळे सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन ‘नीतीमत्ता आश्वासन’ केंद्राने केले आहे. अशा गुंतवणुकीला आधी राष्ट्रीय सुरक्षा समितीची मान्यता अनिवार्य करावी, अशी मागणी केंद्राचे संजीव तारे यांनी केली आहे.
सीआरआरसी नागपूर मेट्रो रेल्वेसाठी ६९ कोच बनविणार असून या कोच स्टेनलेस स्टीलच्या असणार आहेत. ८५१ कोटी रुपयांत हे काम देण्यात आले आहे. कमी किमतीमध्ये कोच उपलब्ध होऊन मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. इतर मेट्रो रेल्वेपेक्षा नागपुरातील ही डील १५ ते २० टक्के स्वस्त झाली असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. मात्र, ही स्वस्त डील भारतासाठी महागात पडू नये, असा धोकाही आता वर्तविण्यात येत आहे.
होऊ शकतो विश्वासघात!
नागपुरातील बुटीबोरी येथे मेट्रो रेल्वेच्या कोच तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि चायना रेल्वे रोलींग स्टॉक कॉर्पोरेशन (सीआरआरसी) यांच्यात नुकताच करार करण्यात आला. सीआरआरसी उपाध्यक्ष झांग मिन यू आणि महाराष्ट्र शासनाकडून विजय सिंघल यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. चीनने नागपुरात रोलींग स्टॉकची निर्मिती करावी यासाठी सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. चीनने त्यावेळी तसे आश्वासनही दिले होते. चीनने हा करार करून आश्वासन पाळल्याचे समाधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त करीत आहे. मात्र चीन विश्वासघात करणार नाही याची कुठली खात्री आहे का, असा सवालच आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट