म. टा. प्रतिनिधी, नागपूर
‘सरकारी रुग्णालय असो की खासगी इस्पितळे, डॉक्टर आणि रुग्णांमधील संबंध ताणले जात आहेत. प्रसंगी रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्लेदेखील होऊ लागले आहेत. रुग्णांच्या मानसिकतेचा खोलात जाऊन विचार केला तर यामागे डॉक्टरांमधील संवादाचा अभाव हे मूळ सापडते. त्यामुळे ‘आणखी कठोर कायदे करा’, असा गळा काढणाऱ्या डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करावे’, असा जालीम डोस ‘डॉक्टर्स व रुग्ण यांच्यातील संबंध’ या विषयाचे अभ्यासक शिवेंद्र सिंघल यांनी रविवारी येथे दिला.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित दोन दिवसीय निमॅकॉन वार्षिक परिषदेच्या निमित्त ते नागपुरात आले असता ‘मटा’शी साधलेल्या संवादात त्यांनी या विषयाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘पूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. त्यामुळे डॉक्टरला रुग्णाच्या घरातील सर्व व्यक्तींच्या आरोग्याशी निगडित इतिहास माहिती असायचा. ही संकल्पना आता कालबाह्य होत आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा पूर्णपणे वापर करायला तयार नाहीत. रुग्णांच्या प्रकृतीशी निगडित माहिती डॉक्टरांकडून दडविली जाते. रुग्णांशी वागताना डॉक्टरदेखील समरस, समदुःखी होऊन वागत नाहीत. इतकेच नाही तर केवळ गल्ला भरण्यासाठी काही डॉक्टर रुग्णांना आजाराशी निगडित पूर्वेतिहास माहिती करून घेण्यासाठी पुरेसा वेळ देत नाहीत. इतकेच नाही तर काहीजण पेशंटला हातदेखील लावत नाहीत. रुटिनच्या नावाखाली अनावश्यक चाचण्या रुग्णांना सुचविल्या जातात. या चाचण्यांपोटी डॉक्टरांना ‘कट’ मिळते. या सर्व घटकांचा कळत नकळत थेट पेशंटच्या खिशावर परिणाम होतो. त्यामुळे डॉक्टर ही केवळ पैसे लुबाडायला बसलेली व्यक्ती म्हणून रुग्ण आणि नातेवाइकांचा ग्रह होऊन जातो. यात डॉक्टरांनी माहिती दडवून ठेवली आणि रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर संतापाचा उद्रेक होतो. रुग्णांकडून ही कृती घडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ही वेळ आपल्यावर ओढवू नये, असे डॉक्टरांना वाटत असेल तर त्यांनी आत्मपरीक्षण करून संवाद वाढवायला हवा.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट