एअर इंडिया या राष्ट्रीय विमानसेवा कंपनीत पहिल्यांदाच केबिन क्रूच्या एक हजार जागा रिक्त आहेत. ही खूप मोठी संधी असून तिथे पोहोचायचे कसे, हे नागपूकरांना माहितीच नव्हते. पण, येथील युवा वर्गात त्याबाबत प्रचंड उत्सुकता आणि क्षमता आहे. या क्षमतेला योग्य मार्ग देऊन नागपूरकरांसाठी 'केबिन क्रू'ची संधी दारात आणण्याचे काम फॉर्च्युन फाऊंडेशनने बुधवारी केले.
युवकांना रोजगारासोबतच स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्याचे काम आमदार प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्त्वात फॉर्च्युन फाउंडेशनकडून केले जाते. याअंतर्गत फाउंडेशनने आता येथील युवक-युवतींना एअर इंडियासारख्या कंपनीत चांगला सुरक्षित रोजगार मिळावा, यासाठी तयार करण्याचे काम केले.
एअर इंडियामध्ये २९ वर्षांपासून केबिन क्रूचे काम करणारे हेमंत सुटे हे युवा वर्गाला या क्षेत्रासाठी तयार करण्याचे कार्य करतात. त्यांच्याच पुढाकाराने येथील महालमधील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात तीन दिवसांपासून ही आगळी कार्यशाळा सुरू होती. त्यामध्ये पहिल्या दिवशी युवक-युवतींची वजन आणि उंचीनुसार छाननी करण्यात आली. त्यात निवड झालेल्यांकडून एअर इंडियासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षणस्थळीच अर्ज भरून देण्यात आला. त्यानंतर त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. उभे कसे राहावे, बोलावे कसे, चालावे कसे, वजन कमी असल्यास वाढवावे कसे, अधिक असल्यास कमी कसे करावे, कपडे कसे असावेत या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाद्वारे आता अंतिम फळीतील हे प्रशिक्षणार्थी राष्ट्रीय चाचणीसाठी स्वत:ला सिद्ध करणार आहेत.
याबाबत हेमंत सुटे यांनी सांगितले की, 'एअर इंडियाला केबिन क्रू मिळेनासे झाले आहेत. चार महानगरे वगळता चंदीगढ येथूनच केबिन क्रू येत होते. पण, आता अन्य कंपन्यांना अधिक पसंती आहे. नागपूरसारख्या शहरांसाठी ही चांगली संधी आहे. आम्हालादेखील या भरती प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला ५०० युवक-युवती आले. त्यातून आता २०० युवा अंतिम चाचणी देणार आहेत. ही चाचणी जून महिन्यात दिल्लीत होत आहे. त्यामध्ये गटचर्चा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी होईल. त्यातून लेखी परीक्षेद्वारे अंतिम निवड होईल. त्यानंतर निवड झालेल्यांना एअर इंडियाकडून तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. पण एकंदर येथील युवक-युवतींचा उत्साह पाहता किमान ४० जणांची निवड होईल, असा विश्वास आहे.'
तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण आणि भरती कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार्यशाळा नि:शुल्क होती. एरवी अशाप्रकारच्या प्रशिक्षणासाठी खासगी संस्था २ लाख रुपये आकारतात. त्यात काहीदेखील वेगळी शिकवत नाही. पण हे २ लाखांचे केवळ प्रशिक्षणच नाही तर किमान ५० हजार रुपये पगाराच्या भरतीची संधीदेखील या युवक-युवतींना येथून मिळाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट