म.टा. प्रतिनिधी, नागपूर
‘वाढत असलेली वाहतूक समस्या सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. याचा फटका गणेश टेकडी मंदिरालाही बसतो आहे. त्यामुळे येथील मध्य प्रदेश परिवहन विभागाची जागा अधिग्रहित करून वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करू’, अशी ग्वाही केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली.
दिवाळीनिमित्त गणेश टेकडी मंदिराच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंदिर टेकडीचे अध्यक्ष पुंडलिकराव जौंजाळ होते. गडकरी म्हणाले, ‘मंदिराची जागा संरक्षण विभागाची आहे. जागेवरून बरेच वाद झाले. तरीही, यातून मार्ग काढण्यात आला. संरक्षण विभागाची जागा असल्याने अनेक अडचणी आल्या. त्यामुळे येत्या काळात रेल्वे आणि परिवहन विभागासोबत चर्चा करून येथील जागेची समस्या सोडविता येईल. गणेश टेकडी मंदिरासमोर वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे बराच वेळ येथे वाहतूक ठप्प असते. हा रस्ता रेल्वेस्थानकाला जोडत असल्याने गर्दी प्रचंड असते. त्यामुळे मध्य प्रदेश परिवहन मंडळाची जागा टेकडी गणेश मंदिराच्या सोयीसाठी होऊ शकते. यातून वाहतुकीतील अडसर कमी करता येतील.’
यानिमित्ताने गडकरी यांनी पाच लाख रुपयांची देणगी गणेश मंदिराच्या कामाला दिली. यावेळी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष माधव कोहळे, संजय जोगळेकर, सचिव श्रीराम कुळकर्णी, विकास लिमये, दिलीप शहाकार, प्रकाश कुंटे, निशिकांत सगदेव, अरुण व्यास, केशव पडोळे, लखीचंद ढोबळे आदी उपस्थित होते.
नव्या जागेवर चर्चा
‘मंदिरात १९६५ सालापासून येत आहोत. येथे आधी केवळ गणेशाची मूर्ती होती. त्यानंतर मंदिराला संरक्षण विभागाची जागा देण्यात आली. हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या जागेवरून उद्भवलेला वाद हळूहळू मिटत आहे’, अशी माहिती गडकरी यांनी दिली. मंदिराचे वास्तुविशारद दिलीप म्हसे यांच्यासोबत गडकरी यांनी चर्चा केली. ‘मध्य प्रदेश परिवहन मंडळाला अन्य ठिकाणी कुठे जागा द्यायची, ही बाब अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे त्यांना नवी जागा लवकरच देण्यावर चर्चा होणार आहे’, अशी माहिती म्हसे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट