नागपूर : पोलिस व महसूल खाते हे भ्रष्टाचाराने फोफावल्याचे चित्र असले तरी राज्यातील महापालिकांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला असून, येथे भ्रष्टाचाराची मोठी रक्कम स्वीकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध महापालिकांमध्ये यावर्षी सर्वाधिक लाचेची रक्कम जप्त केल्याची आकडेवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जारी केली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर यादरम्यान भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एसीबी महापालिकांमध्येच सर्वाधिक जनजागृती करणार असल्याची माहिती आहे. लाच घेणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये महसूल विभाग प्रथम क्रमांकावर असला तरी लाचेची रक्कम घेण्यात मात्र महापालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही, असे दिसते. यावर्षी २७ ऑक्टोबरपर्यंत महसूल विभागातील लाचेची १९६ प्रकरणे उघडकीस आली. यात २३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, लाचेचा आकडा १९ लाख १५ हजार रुपयांच्यावर आहे.तर राज्यातील सुमारे २७ महानगर पालिकांमध्ये केवळ ४१ लाच प्रकरणे उघडकीस आली. ५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, लाचेची रक्कम स्वीकारण्याचा आकडा तब्बल ४१ लाख ५८ हजार रुपयांच्यावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पोलिस विभाग असून, यावर्षी पोलिसांनी २४ लाख १४ हजार रुपयांची लाच स्वीकारली. पोलिस विभागातील १८२ प्रकरणांमध्ये २३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी पाणीपट्टी कर, मालमत्ता कर, नकाशा मंजूर करणे, रस्ते व बांधकाम आदीसाठी नागरिकांकडून लाच घेत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
राज्यात मुंबई, मीरा भायंदर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, पुणे, पिंपरी -चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर, सांगली मिरज, नाशिक,अहमदनगर आदींसह सुमारे २७ महापालिका आहेत.
नगररचना विभागावर करडी नजर
महापालिकेच्या नगररचना विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले आहे. पोलिस महसूल व महापालिका या ‘टॉप थ्री’ विभागांमध्ये जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांमुळे महापालिकेत भ्रष्टाचार वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे महापालिकेच्या कामकाजांवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘मटा’ला सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट