सायबर गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याची आकडेवारी अनेकदा समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणेपुढे सायबर सुरक्षा हे आगामी काळात अत्यंत महत्त्वाचे आवाहन आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या ‘सर्ट’च्या (कम्प्युटर इमर्जन्सी रिसपॉन्स टीम्स) धर्तीवर राज्य सरकारने ‘एमएच सर्ट’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पाकरिता ८५७ कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला आहे. या प्रकारची यंत्रणा उभारणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. राज्याच्या सायबर सुरक्षा सेलचे प्रमुख पोलिस महानिरीक्षक आणि राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी ही माहिती दिली. टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘मीट द प्रेस’ दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सिंग यांनी माहिती व जनसंपर्क खात्यातील विविध घडामोडी आणि नव्या योजनांची माहिती दिली. राज्याच्या सायबर सुरक्षेबाबत बोलताना ते म्हणाले ‘राज्य सरकारने सायबर सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.
त्यासाठी स्वतःची अशी यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या संपूर्ण प्रकल्पाकरिता एकूण ८५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातीलच एकच भाग हा ‘एमएच सर्ट’ आहे. केंद्र सरकारच्या ‘सर्ट’च्या धर्तीवर ही यंत्रणा उभारण्यात येत आहे. देशातील अत्यंत क्लिष्ट सायबर गुन्ह्यांचा तपास ‘सर्ट’तर्फे केला जातो. तसेच खोट्या वेबसाईट्स बंद करण्याचे अधिकारसुद्धा याच यंत्रणेला आहेत. एकंदरीत देशाच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी ‘सर्ट’वर आहे. याच प्रकारची राज्याची स्वतःची अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे.
त्याकरिता अद्ययावत यंत्रसामग्री विकत घेतली जात आहे तसेच सायबर तज्ज्ञांची सेवा घेण्य़ाकरिता त्यांना उत्तम मानधन देण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात ही यंत्रणा सज्ज होण्याची अपेक्षा आहे. स्वतःची अशी सायबर सुरक्षा असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.’
‘डिजिटल किडनॅपिंग’मध्ये भारत दुसरा : सिंग
खासगी कंपन्यांची यंत्रणा हॅक करून ती पूर्ववत करण्याकरिता खंडणी मागण्याचा एक ‘ट्रेन्ड’ सायबर गुन्हेगारीमध्ये सुरु झाला आहे. या प्रकारचे अनेक हल्ले भारतात झाले असून यात देशाचा दुसरा क्रमांक लागतो. अनेक हल्ल्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत येत नाहीत. परंतु जागतिक स्तरावर प्रकाशित झालेल्या अनेक अहवालांप्रमाणे देशाचा दुसरा क्रमांक लागतो, अशी माहिती सिंग यांनी यावेळी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट