आदर्श ग्राम म्हणून सुरादेवीचा विकास करताना लोकसहभाग आवश्यक असून गावात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेची शिकवण देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. याचाच परिणाम म्हणून सुरादेवी हे गाव जिल्ह्यात आदर्श ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कामठी तालुक्यातील सुरादेवी या गावचा आमदार आदर्श गाव म्हणून विकास करण्यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ग्रामस्थांना ग्राम स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बोलत होते.
यावेळी सुरादेवीच्या सरपंच रेखा मानकर, उपसरपंच सुरेश गावंडे आदी उपस्थित होते. गावात स्वच्छता राहावी तसेच साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
गाव विकास समिती स्थापन
आदर्श गावच्या सर्वांगिण विकासाची योजना राबविण्यासाठी ज्योतीताई बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २५ महिलांची गाव विकास समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने विकासासंदर्भात व स्वच्छतेसंदर्भात आराखडा तयार करून त्यानुसार योजनांची अंमलबजावणी करावी. गावात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करावे व आदर्श गावाची संकल्पना साकार करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वच्छ सुरादेवी आदर्श सुरादेवी ही संकल्पना साकार करण्यासाठी ग्राम स्वच्छता समितीमार्फत गावात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले असून, युवकांनी घरोघरी जाऊन स्वच्छते संदर्भात जागरुकता निर्माण केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट