आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीनंतर माओवाद्यांच्या केंद्रीय समितीतील ‘टॉप फाइव्ह’मधील नेता रामक्रिष्णा बेपत्ता आहे. त्याला चकमकीदरम्यान जिवंत ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप मानवाधिकार संघटना व माओवाद्यांकडून होत आहे. तर आंध्र प्रदेश पोलिसांनी याचा इन्कार केल्याने दंडकारण्यात वाद निर्माण झाला आहे. वाद हायकोर्टात पोहचला आहे.
पीपल्स वॉर ग्रुपमध्ये सक्रिय भूमिका बजावणरा रामक्रिष्णा हा मूळचा आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्याच्या अल्लेकापुडू येथील रहिवासी आहे. आंध्र प्रदेश सरकारसोबत माओवाद्यांनी २००३-०४मध्ये केलेल्या चर्चेत रामक्रिष्णाची महत्वपूर्ण भूमिका होती. माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीच्या पाच सदस्यांमध्ये याचा समावेश आहे. सध्या त्याच्यावर आंध्र प्रदेश आणि ओडिशा भागातील संघटनेच्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. महाराष्ट्रसह देशभरातील माओवादग्रस्त भागात दोन कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस रामक्रिष्णावर आहे. पण, २४ ऑक्टोबरच्या चकमकीनंतर रामक्रिष्णा बेपत्ता आहे. चकमकीत ठार झाल्याचेही सांगण्यात येत होते. पण, मृतदेह न सापडल्याने शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.
रामक्रिष्णाने मलकानगिरी जिल्ह्याच्या चकमकीपासून काही किलोमीटर अंतरावरील जंत्री येथे जनसभा घेतली होती. पंचायत निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहनही केले होते. त्यानंतर झालेल्या चकमकीतच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप माओवाद्यांच्या समर्थक असलेल्या मानवी हक्क संघटनेचे वरवरराव आणि कल्याणराम यांनी केला आहे. दरम्यान, माओवाद्यांनी स्वत: छत्तीसगड-ओडिशाच्या घनदाट जंगलात शोध मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या चकमकीत रामक्रिष्णाचा मुलगा मुन्ना उर्फ सिवजी व सुरक्षेची जबाबदारी असलेला बुद्री नामक सुरक्षा रक्षक मारला
गेला होता.
दंडकारण्यातील वाद हायकोर्टात
रामक्रिष्णाची पत्नी शिरीषाने हैदराबादच्या हायकोर्टात याचिका दाखल करून पोलिसांवर रामक्रिष्णाच्या बेपत्ता असल्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आंध्र प्रदेश पोलिसांना नोटीस बजावून म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यानिमित्ताने दंडकारण्यातील वाद हायकोर्टात पोहचला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट