पेट्रोल आणि डिझेलवरील कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा पंपमालक शनिवार, ५ नोव्हेंबरपासून सुरू करणार होते. पण, कमिशनसंबंधी मुंबईत झालेल्या लेखी करारानंतर हे आंदोनल तूर्तास मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
देशभरातील पंप मालकांनी १९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवार आणि शुक्रवारी पंपमालकांनी कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलची खरेदी केली नाही. त्यानंतर आता तिसरा टप्पा शनिवारपासून पंप केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळात सुरू ठेवले जाणार होते. पण, आता मुंबईत झालेल्या बैठकीनुसार आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यामुळे विदर्भातील सर्व १५०० पंप सकाळी ६ वाजेपासून नियोजित वेळेतच सुरू राहणार असल्याचे विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या (व्हीपीडीए) पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पंपमालकांना सध्या पेट्रोलवर २.४२ रुपये तर डिझेलवर १.५० रुपये प्रती लिटर कमिशन प्राप्त होत आहे. त्यावर आता अनुक्रमे १३.८० व १० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, पंपमालकांनी गुरुवार आणि शुक्रवारी कंपन्यांकडून इंधन खरेदी केली नाही. पण, या बंदआधी अतिरिक्त इंधन साठा करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनाचा वाहनचालकांना फटका बसला नाही. पहिल्या दिवशी गुरुवारी सर्वच पंप सुरळीत होते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पंप सुरूच राहिले. मोठी विक्री असलेले शंकरनगर चौकासारखे काही पंप सायंकाळी उशिरा ‘ड्राय’ झाले. नागपूर शहरातील ८९ पैकी जवळपास ८० तर जिल्ह्यातील ३०० पैकी २७० हून अधिक पंप पूर्णवेळ सुरू राहिले.
गाजर ६९० रुपयांचे !
पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांचा एकूण एक लाखाच्या घरातील पगार, प्रत्येक लिटरमागे पेट्रोलची होणारी वाफ, पंप चालविण्यासाठी लाख रुपयांचे विजेचे बिल, अन्य सोयी अशाप्रकारचा खर्च झेलणाऱ्या पंप मालकांची वास्तवातील मिळकत खूपच कमी असते. या तुलनेत मिळणारे कमिशन तसे तोकडेच आहे. त्यासाठीच्या या आंदोलनानंतरही वाढलेले पेट्रोल व नागपूर शहरात रोज होणारी पेट्रोलची उलाढाल यांची गोळाबेरीच केल्यास वाढलेल्या कमिशननुसार प्रत्येक पंप मालकाची रोजची मिळकत सरासरी फक्त ६९० रुपयांनी वाढली आहे. तर शहरात डिझेलची विक्री फारच थोडी आहे. हे एकप्रकारे गाजरच ठरले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट