जीएसटी परिषदेने गुरुवारी खाद्यान्नांना करमुक्त केले. सोबतच, आतापर्यंत चार ते सहा टक्के कर असलेले खाद्यतेल आणि तेलबियादेखील करमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे नागपूरकरांचा ‘तडका’ रोज पाच लाख रुपयांनी स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
सर्व करांचा एकच असलेला ‘वस्तू व सेवा कर’ अर्थात जीएसटी १ एप्रिल २०१७ पासून देशात लागू होणार आहे. या करामुळे विविध प्रकारचे कर रद्द होऊन संपूर्ण देशात एकाच प्रकारची पद्धती असेल. देशाला विकसिकतेकडे नेणारा हा कर नेमका कसा असावा, यासाठी विशेष परिषद स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेने गुरुवारच्या बैठकीत धान्याला करमुक्त केले आणि मध्य भारताची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नागपुरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
‘शेतकरी, उत्पादक, धान्य मिलर्स, व्यापारी आणि ग्राहक या सर्वांसाठी हा खूप स्वागतार्ह निर्णय आहे. महाराष्ट्रात तर आतापर्यंत धान्यांवर कर नव्हता. पण राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये चार टक्के कर होता. यामुळे तेथून येणारे धान्य महाग होते. पण आता या सर्व धान्यांवर शून्य टक्के कर असेल, ही आनंदाची बाब आहे. यामुळे प्रत्येक धान्य सरासरी पाच रुपये किलोपर्यंत स्वस्त होईल’, असा विश्वास इतवारी ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी व्यक्त केला.या निर्णयाचा सर्वाधिक फायदा धान्यापेक्षाही तेलाद्वारे ग्राहकांना होणार आहे. ‘महाराष्ट्रात सध्या तेलावर सहा टक्के तर तेलबियांवर चार टक्के व्हॅट आकारला जातो. या दोन्ही उत्पादनांवर शून्य टक्के कर झाल्यास तेलबियांपासून तेल काढणे स्वस्त होईल. तर खाद्यतेलाचेदेखील दर घसरतील. असा दुहेरी फायदा ग्राहकांना होईल. यामुळे जीएसटी लागू झाल्यानंतर तेलाचे दर किमान ३ ते ५ रुपयांनी कमी होऊ शकतात’, असा विश्वास तेल मर्चंट्स असोसिएशनचे सचिव पुरुषोत्तम मोतियानी यांनी व्यक्त केला. नागपूर शहरात रोज १०० टन अर्थात सुमारे ८० लाख रुपये तेलाची खरेदी-विक्री होते. त्यावर ४.८० लाख रुपये व्हॅट भरला जातो. तर एक किलो तेलबीपासून सरासरी १८ ते २५ टक्के तेल निघते. त्यावरही चार टक्के व्हॅट लागत होता. हा कर आता शून्य टक्के झाल्यानंतर नागपूरकरांची रोजची किमान ५ लाख रुपयांची बचत होईल. त्याचा प्रभाव हॉटेलमधील दाल तडका, समोसा, भाज्या या सर्वांवर होऊन त्याचे दर कमी होऊ शकतील, अशी आशा आहे.
तेलाचे सध्याचे दर
-सोयाबीन : ६७० रुपये (१० किलोचे पॅकेट्स)
-सनफ्लॉवर : ११२० रुपये (१५ लिटरसाठी)
-शेंगदाणा : १४७१ रुपये (१५ लिटरसाठी)
-सोयाबीन बी : २९०० रुपये (प्रती क्विंटल)
छोट्या व्यापाऱ्यांनी प्रशिक्षित व्हावे!
‘चार प्रकारचे दर जीएसटीत असल्याने महागाई नियंत्रित होईल. पण या चार श्रेणीत कुठल्या वस्तू असतील, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. तरच जीएसटीचा लाभ अखेरच्या ग्राहकाला मिळू शकेल. तसेच ही संगणकीकृत प्रणाली असल्याने छोट्या व्यापाऱ्यांना प्रशिक्षित होण्याची गरज आहे’, असे अ.भा. व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले.
डोकेदुखी वाढू नये!
‘किमान करमर्यादा आधी सहा टक्के होती ती आता पाच टक्के केली, हे स्वागतार्ह आहे. पण, कमाल मर्यादेबाबत १८ टक्क्यांचे आश्वासन होते. ती मर्यादा २८ टक्के केली जात आहे. ही खटकणारी बाब आहे. यामुळे भविष्यात हा कर डोकेदुखी ठरू नये, हीच अपेक्षा आहे’, असे चेम्बर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (केमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट