वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाऱ्यांवरच वचक बसावा यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांकडून फोटो काढून कारवाई करण्याची मोहीम गेल्या महिनाभरापासून सुरू झाली आहे. या महिनाभरात हजारो वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्या पत्त्यावर चालान पाठविण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलिसांचा वेळ वाचत असून पैसे वसुलीवर प्रतिबंध आला असल्याचे दावे वाहतूक पोलिसांकडून केले जात असले तरी या मोहिमेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. खासगी मोबाईलमध्ये आमचे फोटो का काढता, असा रोष महिलांमधूनही व्यक्त होऊ लागला आहे.
वाहतूक पोलिसांना कॅमेरे पुरवता येऊ शकतात. या कॅमेऱ्यातील फोटो सुरक्षित असतील अशी व्यवस्था करावी, असे मत काही महिलांनी व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या मोहिमेची गरजच नसल्याचे मत माजी सहपोलिस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केले. केवळ पुरावा म्हणून फोटो काढले जात असतील तर त्याला काहीच अर्थ नाही. मुंबई पोलिस कायद्यात आणि मोटर व्हेइकल अॅक्टमध्ये पोलिसांच्या समोर नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्याला कारवाईचे अधिकार असल्याचे कंगाले म्हणाले.
महिलांचा विरोध
मुलींचे अशा पद्धतीने फोटो काढल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपला फोटो काढला जातो यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या फोटोंचा गैरवापर होणार नाही याचे प्रमाणपत्र पोलिसांकडे आहे का? खासगी मोबाइलमध्ये फोटो न काढता यासाठी शासकीय यंत्रणा हवी. आजच्या सोशल मीडियाच्या काळात खाजगी मोबाइलमध्ये फोटो काढण्याचे धोके अधिक असल्याचे मत डॉ. प्रेमलता तिवारी यांनी व्यक्त केले. फोटो काढायचाच असेल तर केवळ गाडीच्या नेमप्लेटचा काढा. इतर शहरांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरेही बसविता येतील, असे मत रूपेंदरकौर सतवाल यांनी व्यक्त केले.
दंड भरला तर फोटो नाही : पाटील
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याने त्याचवेळी दंड भरला तर त्या व्यक्तीचा फोटो काढला जाणार नसल्याचे शहराच्या वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले. फोटो काढल्यानंतर पोलिस ठाण्यात त्याची नोंद होते. फोटो कोणाच्या मोबाइलमधून आला, हे नोंद असल्याने गैरवापर होण्याचा धोका नाही. अनेक मॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडीओ शूटिंग होत असते. त्यामुळे या कारवाईवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. या मोहिमेमुळे कारवाईची संख्या वाढली. पोलिसांकडून पैसे घेतले जातात या प्रकारांनाही आळा बसला आहे, असा दावा पाटील यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट