नाटकाचे अधिष्ठान म्हणजे श्रीनटराज असून, प्रयोगारंभी त्याचे पूजन केले जाते. आराधनेचे व पूजनाचे रंगमंचीय आविष्करण म्हणजे नांदी. अशा गाजलेल्या मराठी संगीत नाटकांमधील नांदींवर आधारित अप्रतिम कार्यक्रम रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्या म्हणजे शुक्रवारची संध्याकाळ सुमधूर
करून गेला.
विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात ‘तुम्हां तो शंकर सुखकर हो!’ हा संगीतमय कार्यक्रम रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. विदर्भ साहित्य संघ निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना, आरेखन व निवेदन प्रकाश एदलाबादकर यांचे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर व ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांच्या हस्ते झाले. नाट्यकलावंतांची कार्यक्रमाला भरगच्च गर्दी होती.
राजकवी भा. रा. तांबे यांच्या ‘आरती त्रिभुवन जनकाची अर्ध नारी नटेशाची’ या नांदीने राधाबाई कानिटकर संगीत विद्यालयाच्या श्रीरंग नादरखानी, जयादित्य नाथ, अपूर्वा देशपांडे, अदिती आंबेकर, तनया वनकर, वृंदा कानिटकर व चैतन्य माटेगावकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘संगीत शाकुंतल’ नाटकातील अतिशय लोकप्रिय नांदी ‘पंचकुंड नररुंड मालधर’, संगीत सौभद्र मधील ’तुम्हां तो शंकर सुखकर हो’, व ‘प्रभुपदास नमित दास’ या नांदी सायली पेशवे, आश्लेषा मानमोडे, तृप्ती लांजूडकर, तृष्णा लांजूडकर, पल्लवी डोंगर, प्राची नक्षे, राधा देशकर, निर्मिती देवलसी, प्रा. वैशाली उपाध्ये या श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या गायकांनी सादर केल्या. एलएडी कॉलेजच्या मंजिरी अय्यर, सुगंध अय्यर, मयुरेश काळे, राधा ठेंगडी व देविका नायर यांनी ‘नमुनी ईशचरणा’, ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘जय गंगे भागिरथी’ व ‘विश्वनाट्य सूत्रधार तूच शामसुंदरा’ या नांदी अतिशय उत्कृष्टपणे सादर केल्या. ‘सौख्य सुधा वितरो’, ‘हे जगदीश सांब सदाशिव’, ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या नांदींनी वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेच्या कलाकारांनी कार्यक्रमाचा समारोप केला. निखिल मडावी, विशाल जेन, सोनाली मिलमिले, पूजा मिलमिले, नंदिनी ढगे आदी कलाकारांची त्यात सहभाग होता. गायकांना संवादिनीवर राहूल मानेकर यांनी तर तबल्यावर श्रीधर कोरडे यांनी उत्तम साथ दिली. प्रकाश एदलाबादकर यांच्या नांदी व पर्यायाने संगीत नाटकाचा प्रवास उलगडणाऱ्या निवेदनाने कार्यक्रम अधिक उंचीवर नेला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट