सर्व करांचा समावेश असलेला वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी १ एप्रिल २०१७ पासून देशात लागू होत आहे. देशाच्या कर प्रणालीला विकसित देशांच्या रांगेत नेऊन ठेवणारा हा कर आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जीएसटी परिषदेद्वारे करासंबंधीची रचना आकार घेत आहे. पण हा कर नेमका काय आहे, हे विदर्भातील सीएंना समजावून सांगण्यासाठी महत्त्वाचे चर्चा नागपुरात होत आहे. इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम क्षेत्रीय परिषदेंतर्गत नागपूर, अमरावती व अकोला या तीन शाखा कार्यरत आहेत. या तीन शाखांमधील सीए या चर्चासत्रासाठी नागपुरात येत आहेत. रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे ही परिषद होत आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजता ही परिषद सुरू होईल. आयसीएआयचे माजी राष्ट्रीय नागपूरचे अशोक चांडक, पश्चिम क्षेत्राचे सदस्य उमेश शर्मा, मनिष गादीया, दिलीप फडके, सुनील गाभावाला यांच्यासह नागपुरातीलच अजीत गोकर्ण हे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. ‘अशाप्रकारे जीएसटीवर सलग दोन दिवसांचा प्रकाश टाकणारे चर्चासत्र विदर्भात पहिल्यांदाच होत आहे. यामुळेच केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ७५० हून अधिक सीए सदस्य यासाठी नागपुरात येत आहेत. या चर्चासत्रात उपस्थित राहणाऱ्यांना सलग १२ तासांच्या शिक्षणाचा अनुभव मिळेल. सीए विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे असेल’, असे नागपूर शाखेचे अध्यक्ष स्वप्नील घाटे यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट