निवडणुकांचे वारे वाहत असल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी विविध समित्यांच्या बैठकींना दांडी मारली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बैठकींना अनुपस्थित राहण्याचा 'सिलसिला' सदस्यांनी चालविला आहे.
शिक्षण, आरोग्य आणि कृषी समितीच्या सभेत अनेक सदस्यांची अनुपस्थिती होती. जिल्हा परिषदेत दहा समित्या आहेत. प्रत्येक समितीत आठ ते दहा सदस्य आहेत. वेगवेगळ्या पक्षातील सदस्यांना समित्यांवर स्थान दिले जाते. बैठकींमध्ये विकासकामांवर चर्चा केली जाते. सर्वसाधारण सभेत येणाऱ्या विषयांवर तोडगा काढण्यात येतो. यासाठी महिन्याला सभा घेण्यात येते. मात्र, सभांना अनुपस्थित राहून नागरिकांना कोणता संदेश सदस्य देत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. येत्या फेब्रुवारीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांपूर्वी होणाऱ्या बैठकींमधून विविध समस्या सोडविण्याची संधी सदस्यांना होती. पण, बैठकींकडे पाठ फिरविल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पाणी फेरल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्य समितीची बैठक झाली. त्यावेळी बैठकीला समितीतील आठ सदस्यांपैकी एकही उपस्थित नव्हता. ही बैठकच रद्द करण्याची वेळ समितीवर आली. तर, महिनाभरापूर्वी कृषी समितीत कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने बैठक रद्द करावी लागली होती. परिणामी, बैठकींमध्ये कधी सदस्य, तर कधी अधिकाऱ्यांची दांडी चर्चेचा विषय ठरत आहे. बैठकींमध्ये सदस्यांची गैरहजेरी ही चिंताजनक बाब आहे. येत्या काळात निवडणुका आहेत. अनेकांचे सर्कल आरक्षित झाल्याने बैठकींना जाऊन काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट