ऐन निवडणुकीच्या हंगामात पारशिवनी आणि वानाडोंगरी नगरपंचायत झाल्याने राजकीय पुढाऱ्यांना धक्का बसला आहे. याचा फटका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता लक्षात असल्याने नव्याने सीमांकन करून आरक्षण काढावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.
पारशिवनी व वानाडोंगरी जिल्हा परिषदेचे सर्कल आहेत. पारशिवनी इतर मागासवर्गीय महिला आणि वानाडोंगरी इतर मागासवर्गींयासाठी राखीव आहे. मात्र, नगरपंचायतीची अधिसूचना आल्याने राजकीय पुढाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नगरपंचायतीचा कुणाला फटका, तर कुणाला संधी मिळेल, याचा शोध राजकीय मंडळी घेत आहेत. दोन्ही सर्कल नगरपंचायत झाल्याने येत्या सहा महिन्यात नव्याने निवडणूक होऊ शकते. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीचे अंदाज तंतोतंत बांधता येत नसल्याचे राजकीय मंडळी संभ्रमात आहेत. पारशिवनीची लोकसंख्या १२ हजार आहे. तर, वानाडोंगरीची लोकसंख्या सुमारे ४० हजार आहे. पारशिवनीपेक्षा लहान ग्रामपंचायत करंबाळ, तर वानाडोंगरीपेक्षा लहान ग्रामपंचायत कान्होलीबारा आहे. त्यामुळे ही गावे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्कल म्हणून घोषित होऊ शकतात. सध्या यावर आयोगाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग यांनी आक्षेप घेत या दोन्ही सर्कलचे नव्याने सीमांकन करून आरक्षण काढावे, अशी मागणी केली आहे. यावर योग्य निर्णय घ्यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी राजाभाऊ टाकसाळे, राजेंद्र वाघ, रमेश भोयर, उज्ज्वला भोयर, जीतू बोढरे आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट