जिल्हा परिषदेने सरपंच भवनातील सायकलचे कंत्राट दारूड्याला दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत असतानाही कंत्राट रद्द का केले जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरपंच भवनातील सायकलचे कंत्राट बांधकाम विभागाने दिले आहे. येथे ये-जा करणाऱ्यांकडून नियमानुसार शुल्क आकारले जाते.
मात्र, येथील कंत्राटदार दारू पिऊन नागरिकांना शिविगाळ करीत असल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. जनतेच्या सोयीसाठी शासकीय कार्यालयांची स्थापना झाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या सरपंच भवनात जनतेलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सरपंच भवनात दररोज सकाळपासून रेलचेल सुरू होते. शासकीय काम म्हटले की, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद गाठावी लागते. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना कंत्राटदाराच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दारू पिऊन येथे धिंगाणा घातल्याचा येथे पहिलावहिला प्रकार नाही, यापूर्वीही असे झाले आहे. तरीही, बांधकाम विभाग कंत्राटदाराला पाठीशी घालत आहे, असा आरोप होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी सरपंच भवनातील सायकल कंत्राटदाराची हकालपट्टी करा, अशी मागणी करण्यात आली होती. पण, याकडे बांधकाम विभागाने लक्ष न दिल्याने कंत्राटदाराची हिम्मत वाढतेय, असे दिसत आहे. सायकलच्या कंत्राटासाठी नव्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली नसल्याची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करून सायकल कंत्राटदारावर कारवाई करू, अशी माहिती बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट