प्रतिनियुक्तीची चर्चा सुरू असतानाच मागील तीन ते पाच वर्षांत जिल्हा परिषदेत अंतर्गत बदल्या झाल्या नसल्याने खळबळ उडाली आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेतलेला नाही.
त्यातच मागील तीन ते पाच वर्षांपासून अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या नसल्याने जिल्हा परिषदेची पंचाईत झाली आहे. या बदल्या रखडण्यामागे कोणताही पाठपुरावा न करणे, विविध विभागातील अंतर्गत बदल्यांचा आराखडा तयार न करणे, हे कारण असल्याचे समजते. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत अंतर्गत बदल्या करण्यात येत आहे. मात्र, २०१४-१५ मध्ये अंतर्गत बदल्यांचा विसर जिल्हा परिषदेला पडला आहे. तर, १५ मे २०१४ रोजी ग्रामविकास विभागाने अधिसूचना प्रसिध्द केली. यात तीन आणि पाच वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली करणे बंधनकारक आहे. पण, या सर्व नियमांचे उल्लंघन जिल्हा परिषद करीत असल्याचा आरोप होत आहे. २०१३ साली पात्र कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. पण, नागपूर जिल्हा परिषदेला ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेतील मुद्दांवर लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. जवळपास २५ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. एक-दोन विभागातील कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली झालेली नाही. तर, सर्वच विभागात अंतर्गत बदल्या झाल्या नसल्याने तारांबळ उडाली आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेत जवळपास ५० कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. या प्रतिनियुक्तीमुळे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीवर कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा ताण वाढताेय. तरीही, जिल्हा परिषदेने अजूनही प्रतिनियुक्तीवर ठोस निर्णय घेतलेला नाही. प्रतिनियुक्तीवर तीन बैठका घेण्यात आल्या. पण, काही सदस्यांनी विरोध केल्याने अधिकाऱ्यांसमोर अडचणी येत आहेत. तर, यासाठी कर्मचारीही मूळ ठिकाणी जाण्यास इच्छुक नसल्याचे कळते. परिणामी, प्रतिनियुक्ती बारगळणार, असेच दिसत असताना आता अंतर्गत बदल्यांचा वाद समोर आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट