लहान मुलांचे शिक्षण, वयाची साठी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यापासून सर्व गोष्टींचा पाठपुरावा युरोपियन देशांतील सरकार करते. तुलनेत भारतात आजही ग्रामीण भाग शैक्षणिक, आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. ही बाब हेरून पंजाबच्या नवा शहरजवळ आम्ही अद्ययावत सुविधा असलेली शाळा सुरू केली आहे. पुढच्या टप्प्यात कर्नाटकातल्या बिदरजवळ हथ्याल येथे आणखी एक शाळा सुरू होईल, अशी माहिती ग्रेट ब्रिटन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियलचे संस्थापक सुरिंदर झल्ली यांनी शुक्रवारी येथे दिली.
डॉ. आंबेडकरांचे विचार युरोपात पोहोचावेत, यासाठी झिल्ली यांच्या पुढाकारातून १९६५ मध्ये मेमोरियलची स्थापना झाली. या संस्थेने आजवर आंबेडकरी विचारांची लाखो पुस्तके छापून ती युरोपातल्या ग्रंथालयात पोहोचविली आहेत. दिवाळीनिमित्त मेमोरियलचे १७ पदाधिकारी देशाच्या भ्रमंतीवर निघाले आहेत. बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा असलेल्या तीर्थस्थळांपासून ते एतिहासिक ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. या प्रवासात या शिष्टमंडळाने शुक्रवारी दीक्षाभूमीला भेट दिली. त्यानिमित्त साधलेल्या संवादात झिल्ली यांनी ब्रिटन आणि भारतातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘युरोपात ज्येष्ठ व्यक्तींना सरकार पेन्शन देते. शिवाय, त्यांना आरोग्यसुविधादेखील मोफत आहेत. भारतात मात्र आजही प्राथमिक शिक्षणासून ते वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. भारताच्या तुलनेत युरोपियन देशांमध्ये आरोग्यावरची आर्थिक तरतूद चौपट आहे. त्यामुळे स्थानिक सरकारांनी यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे विचार आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार व्हावा यासाठी आम्ही ग्रेट ब्रिटनध्ये वस्तुसंग्रहालय सुरू केले आहे. यात बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या ८५हून अधिक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेच्या स्थापनेच्यावेळी बाबासाहेबांच्या त्या काळातील पार्लमेंट गेटपासपासून ते त्यांचा चष्मा, काठी, टाय, कोटाचे कफ बटन यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. पुढच्या टप्प्यात देशाच्या विकासात फूल ना फुलाच्या पाकळीचे योगदान देण्यासाठी आम्ही गरिबांसाठी अद्ययावत शैक्षणिक सुविधा असलेल्या शाळा सुरू करणार आहोत.’
वस्तुसंग्रहालयाचा विकास
ग्रेट ब्रिटन येथून दीक्षाभूमीच्या भेटीला आलेल्या शिष्टमंडळात देवलाला सुमन, बक्सोदेवी सुमन, मोहेंद्रो कौर, तरसेन कौर, गुरुदेव कौर, मुलकराज कौर, शशिकुमारी, जगदीश रॉय, समरितादेवी, मुरला मल, हरभजन कौर, धर्मपाल बंगर, जोगिंदर कौर, हरपाल भाटिया, निर्मला भाटिया यांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई, कार्यवाह सदानंद फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, विजय चिकाटे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट