मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी वर्धा मार्गावरील छत्रपती पूल तोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे मनीषनगरच्या रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्नही सुटेल. छत्रपती पूल तोडण्याचे काम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, नागपूर हिवाळी अधिवेशन लक्षात घेता त्यापूर्वीच वर्धा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
१५ दिवस म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत पूल तोडण्याचे काम चालणार आहे. या दरम्यान हा मार्ग बंद राहणार असून वर्ध्याकडून नागपूरकडे येणाऱ्या वाहनांना रेडीसन ब्लू हॉटेलकडून खामलाकडे जावे लागेल. खामला मार्गे पुन्हा ऑरेंज सिटी हॉस्पिटलकडून डीईओ नगर मार्गावरून अजनीकडे जावे लागेल. रेडीसन ब्लू हॉटेलकडून नरेंद्रनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाकडूनही अजनीकडे जाता येईल. गजानन नगरकडून वर्धा मार्गाला पुन्हा लागता येईल. एनएमआरसीएलने पर्यायी मार्गांचा नकाशा तयार केला आहे.
१५ नोव्हेंबरपासून पूल तोडण्याला सुरुवात होणार असून पूल तोडायला १५ दिवस लागणार आहे. नागार्जुन कंपनीने पूल तोडण्याची जबाबदारी मते अॅण्ड असोसिएट्सला सोपविली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा पूल तोडण्यात येणार असून या पुलापासून निघणारा मलबा मेट्रो रेल्वेच्या कामातच वापरण्यात येणार आहे. नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी एनएमआरसीएलचे कर्मचारी तैनात राहणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
सध्या तात्पुरते कामगार
मेट्रो रेल्वेचे मार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठीचे कंत्राट वेगवेगल्या कंपन्यांना दिले आहेत. या कामासाठी लागणारा कामगार वर्ग हा तात्पुरता स्वरूपाचा आहे.
पुलाजवळ राहणाऱ्यांना प्रवेश
छत्रपती पूल पाडण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे या दिशेने जाणारे मार्ग बंद करण्यात आले असले तरी पुलाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना तिथे जाण्यास प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश देताना योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. प्रतिबंधात्मक स्वरूपाचा हा प्रवेश असेल, असे दीक्षित म्हणाले. पूल तोडण्याची प्रक्रिया मोठी असल्याने नागरिकांची गैरसोय होईल, मात्र ही गैरसोय कशी कमी करता येईल यासाठी एनएमआरसीएल सज्ज असल्याचे
हिंगणा मार्गावरील काम लवकरच
हिंगणा मार्गावरील स्टेशनच्या कामालाही सुरुवात झाली आहे. व्हायडक्ट तयार करण्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. २० नोव्हेंबरपासून बॅरीकेट्स टाकायला सुरुवात होणार असल्याचे दीक्षित म्हणाले. खाजगी जमीन मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन जमीन संपादित केली जाणार आहे. कर्ज मिळण्यासाठीचा फ्रान्ससोबतचा करारही लवकरच नागपुरात होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट