Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

येथे समस्याच ठरतात ‘नवाब’

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

शहराचा सर्वात जुना भाग म्हणजे महाल. याच महालातील नवाबपुरा ही गजबजलेली वस्ती मात्र आज त्रासात आहे. कुठे खोदलेल्या रस्त्यांचा मलबा तर कुठे खड्डे किंवा नळाची समस्या. येथे समस्याच ‘नवाब’ आहेत, असे म्हणूनच उपाहासाने म्हटले जाते. आतापर्यंत झालेला विकास जुना झाला. त्यामुळे मातब्बर राजकारण्यांच्या या भागात पुनर्विकासाची गरज आहे.

नागपूर शहराचा मागील २० ते २५ वर्षांत भरपूर विस्तार झाला असला तरी जुन्या शहराची पत औरच आहे. आजही पश्चिम अथवा त्याहून अलीकडे वाढलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरला इतवारी, महाल या जुन्या भागातील लोक नवीन शहर म्हणतात. यामुळे जुन्या शहराला आजही महत्त्व आहे. पण, हे महत्त्व केवळ भावनिक असून प्रशासनाला त्याच्याशी काही घेणे-देणे आहे का, असा प्रश्न वस्तीतील ना‌गरिकांना पडला आहे.

नवाबपुरा हा महालमधील गंगाबाई घाट रस्त्यावरील महत्त्वाचा भाग आहे. दाटीवाटीची वस्ती असलेल्या या भागात अनेक वर्षांपासून घरातील नळाचे पाइप छोटे होते. त्यामुळे पूर्ण जोमाने पाणीपुरवठा होत नव्हता. यासाठी प्रशासनाने अलीकडेच तेथे पाइपलाइनचे काम केले. पण यासाठी रस्ता खोदल्यानंतर त्याचा मलबा तसाच टाकण्यात आला. या मलब्याचा आता तेथे मोठा ढीग झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शहीद शंकर महाले स्मारकाजवळ अगदी रस्त्याच्या कडेला हा मलबा पडून आहे. त्याचा वाहन चालविणाऱ्यांना खूप त्रास होतो. सायकलस्वारांच्या अपघाताची भीती असते.

एकीकडे मलब्याचा त्रास असताना दुसरीकडे याच परिसरातील रस्त्याचीदेखील स्थिती चांगली नाही. रस्त्याचे डांबरीकरण होऊन अनेक वर्षे झालीत. त्यात पाइपलाइनचे काम झाल्‍याने आता रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे एकीकडे मलबा आणि दुसरीकडे खड्डे असा दुहेरी सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे.

महाल हा भाग गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या जवळचा आहे. त्यांच्या खास विश्वासातील नेते याच भागातील आहेत. यामुळे या भागातील अनेक नागरिकांचा या नेत्यांशी जवळचा संबंध असतो. त्यांनी वारंवार स्थानिक नेत्यांकडे या समस्यांविषयी तक्रार केली. पण आश्वासनांच्या पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

आमच्या भागात पाण्याची समस्या पूर्वीपासूनच होती. त्यामुळे पाइपलाइन टाकण्यात आली, हे स्वागतार्ह आहे. पण त्याच पाइपलाइनचा मलबा येथे पडून आहे. या मलब्यामुळे येथील प्रसिद्ध खिरानी हनुमान मंदिरात येणाऱ्या भक्तांनाही त्रास होतो. तर दुसरीकडे ही पाइपलाइन टाकल्यानंतर अद्यापही पाण्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.

-श्रावणजी भाकरे, रहिवासी, नवाबपुरा, महाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>