‘काँग्रेसमधे सगळे आलबेल आहे. कुणी असंतुष्ट नाही, कुणी वेगळा पक्ष काढणार नाही. पक्षातील कुणी नेता अथवा कार्यकर्ता वेगळ्या पक्षाची भाषा बोलत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल’, असा इशारा विधानसभेतील उपनेते व काँग्रेसचे विदर्भ समन्वयक विजय वडेट्टीवार यांनी दिला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील मतभेद वाढले आहेत. एकमेकांच्या समर्थकांचे पत्ते कापले जाण्याच्या शक्यतेवरून काही नेत्यांनी विदर्भ इंदिरा काँग्रेस स्थापन करण्याची तयारी चालविली असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रकाशित करताच खळबळ उडाली. पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात शनिवारी सायंकाळी तातडीने पत्रपरिषद घेतली आणि बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला.
२ ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी काँग्रेसच्या दोन गटांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतले. तीन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलन व निषेध सभेत पक्षांतर्गत गटबाजी दिसून आली. पक्षाच्या नेत्यांनी मात्र आमच्यात कुठलेच मतभेद नसल्याचा दावा केला.
वडेट्टीवार म्हणाले, ‘सर्वच पक्षांत लहान-मोठ्या प्रमाणात कुरुबूर असते. याचा अर्थ कुणी वेगळा पक्ष काढणार, असा होत नाही. मतभेद असल्यास दूर करता येतील. विदर्भाचा समन्वयक म्हणून पक्षाने जबाबदारी दिली आहे. त्यानिमित्त नेते, कार्यकर्त्यांशी संवाद, चर्चा होते. परंतु, कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही वा वेगळा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले नाहीत. कुणीही तक्रार केलेली नाही. याबाबत कुणी बोलत असल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.’
भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. पाणी, मालमत्ताकरात प्रचंड वाढ करून जनतेला लुटण्यात येत आहे. दहा वर्षांत सत्तारुढ भाजपने शहराचा सत्यानाश केला. काँग्रेसच्या संदर्भात खोटीनाटी माहिती भाजपच पसरवित आहे, त्याचा कुठळाच परिणाम होणार नाही. काँग्रेसचे विधानसभानिहाय मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी लहान सभा, बैठका सुरू आहेत. पक्षाची स्थिती भक्कम होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांकडून असे वृत्त पसरवण्यात येत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
स्थानिक नेत्यांनी शिफारस केलेल्या कार्यकर्त्यांची नावे प्रदेशला पाठवल्यानंतर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. सलग तीन बैठकांना गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या जागेवर अन्य कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. हे आधीच जाहीर करण्यात आल्याचा पुनरुच्चार विकास ठाकरे यांनी केला.
ठाकरेंचे काम उत्तम; लुडबूड नको!
नागपुरात विकास ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. शहराच्या सर्व प्रभागांत संघटन बळकट करण्यासोबतच निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यात कुणीही लुडबूड करण्याची गरज नाही, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला.
मतभेद मिटवा!
काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चेवरून वादळ उठले असताना, समन्वयक वडेट्टीवार यांनी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना फॅक्सद्वारे घटनाक्रम कळविला. काँग्रेसला धोका नसल्याचे स्पष्ट करताना, गटबाजी संपविण्यासाठी श्रेष्ठींनी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट