नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणीचा पहिला टप्पा शनिवारी संपला. पाच जिल्हे मिळून ३० हजारांपर्यंत मतदारनोंदणीचा आकडा पोहोचला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत अद्यापही कमी संख्येने मतदारांनी आपली नावे नोंदविल्याने यापुढेही नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यावेळी होणार आहे. या निवडणुकीत मतदानासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची मतदारनोंदणीच पहिला टप्पा शनिवारी संपला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने ही नोंदणी प्रक्रिया राबविली जाते आहे. ५ नोव्हेंबर ही पहिल्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम तारीख होती.
‘मतदारनोंदणींचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट व्हायचा आहे. मात्र, २९ ते ३० हजार इतक्या शिक्षक मतदारांनी नोंदणी केली आहे. हा केवळ नोंदणीचा पहिला टप्प होता. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून केली जाईल. ७ डिसेंबरपर्यंत ही दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी चालेल,’ असे नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
या मतदारनोंदणीसाठी पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली होती. मागील निवडणुकीत नागपूर विभागात सुमारे ४० हजार मतदारांची नोंदणी झाली होती. तो आकडा यंदा गाठता येईल, याबाबतही संघटनांनी शंका उपस्थित केली होती. मात्र, ७ डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे अनुपकुमार म्हणाले. सध्या बहुतांश शाळांना दिवाळीच्या सुट्या आहेत. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर या मतदारनोंदणीत वाढ होण्याची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट