म.टा. प्रतिनिधी, नागपूर
पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्याची पुराव्यानिशी तक्रार विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही. गैरप्रकाराला पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप करीत काँग्रेसने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच निवेदन सादर केले.
महापालिकेचे विरोधीपक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, सुजाता कोंबाडे, दीपक वानखेडे पंकज थोरात, पद्मा उईके, प्रेरणा कापसे, घनश्याम भांगे, देवा उसरे, प्रशांत धवड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी ठाकरे यांनी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ५३ येथून घनश्याम चौधरी यांनी भाजप, तर संजय सरायकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. तर परिणय फुके अपक्ष उमेदवार होते. यात फुकेंचा विजय झाला. बोगस मतदारांची नावे नोंदवण्यासाठी खोटे वीजबिल, बोगस शाळेचे दाखले व इतर कागदपत्रे तयार केली होती असे मुद्दे ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पत्रकार परिषदेस उमाकांत अग्निहोत्री, संदेश सिंगलकर, नगरसेवक देवा उसरे, अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, राजेश कडू आदी उपस्थित होते.
आठ दिवसांचा अल्टिमेटम
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मतदारांचा यात समावेश असून काटोल, नरखेड तालुक्यातील नागरिकही समाविष्ट आहेत. एकाच घरी ४० भाडेकरू दाखविण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी काही बोगस मतदार समोर आले होते. हजारो बोगस मतदार असल्याचेही पुढे येऊनही कारवाई करण्यात आली नाही. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीन महिने झाले, मात्र प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात आले. त्यामुळे येत्या आठ दिवसांत कारवाई करा असा अल्टीमेटमच आता काँग्रेसने दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट