शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीज बिलावर तोडगा काढण्याकरीता प्रत्येक फीडरवर अकरा शेतकऱ्यांचा एक गट तयार करावा व शेतकऱ्यांची थकबाकी व अन्य प्रलंबित मुददयांसाठी त्यांना काही अधिकार दयावे असा प्रस्ताव महावितरणच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. यासंदर्भात गुरुवारी मुंबईत ऊर्जामंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज जोडणी, फिडर मॅनेजर योजना, राज्यातील सर्व मुख्य अभियंता/अधीक्षक यांचा शुक्रवार व शनिवारचा दौरा कार्यक्रम, राज्यात ट्रान्सफॉर्मर भवनची निर्मिती, कर्मचारी मुख्यालयी राहणे, नवीन वीज बील भरण केंद्र ग्रामपंचायत स्तरापर्यंत आणणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला ऊर्जामंत्र्यांसह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडणी बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेली उदासिनतेवर खडसावत व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी प्रत्येक झोनच्या मुख्य अभियंत्यांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या थकबाकी बाबत ऊर्जामंत्र्यांनी प्रत्येक फिडरवर शेतकऱ्यांचा एक गट तयार करुन शेतकऱ्यांना वीज भरण्यास जागृत करणे तसेच आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकरण व आकडे टाकताना जीव गमवण्या सारखे प्रकार घडू नये या करिता शेतकऱ्यांचा गट उपयुक्त ठरेल अश्या सूचना दिल्या.
अमरावती, अकोला, बारामती व औरंगाबाद या झोन मध्ये ट्रान्सफॉर्मर बंद पडण्याची संख्या अधिक आहे. या पाच झोन मधून ८ हजार ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी दिले गेले आहेत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मूळे काही-काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जातो. अधिकाऱ्यांच्या अश्या वागणुकीवर संजीव कुमार यांनी त्यांना धारेवर धरले व त्यापुढे कमीत कमी कालावधीत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना दिल्या. या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफॉर्मर भवन बसवण्याबाबत लवकरात लवकर टेंडर काढून योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट