रिझर्व्ह बँकेने दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली. परंतु, नागपुरात केवळ दोनच हजारांच्या नव्या नोटा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे बँकांमधून रोख रक्कम काढताना किंवा जुन्या नोट बदलून घेताना नव्या दोन हजारांच्या नोटा देण्यात आल्या. त्या नोटा हातात पडल्यानंतरही बाजारात चिल्लर चलन उपलब्ध होत नव्हते. परिणामी, खिशात पैसा आल्यानंतरही अनेकांना तो खर्च करता आला नाही. त्यामुळे शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या चलनावरच अधिक ताण पडला. बँकांच्या एटीएममधूनही केवळ शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्या. त्यातही एकावेळी केवळ दोन ते अडीच हजार रुपयेच काढण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, बँक खात्यातून रोख रक्कम काढण्याची मर्यादा २० हजार आणि नंतर आणखीन वाढवून देण्यात आली होती. त्यानंतरही अर्थव्यवस्थेत चलनवाढ झालेली नव्हती. त्यावर उपाय म्हणून आता १३ दिवसांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाचशेच्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी नागपूरच्या आरबीआयमध्ये नव्या पाचशेच्या नोटा पोहोचल्या असून त्याचे शहरातील बँकांना वितरण करण्यात आले आहे. तर मंगळवारपासून नियमितपणे चलन पुरवठा होणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत चलन पुरवठा सुरळीत होऊन निर्माण झालेली आर्थिक संकटाची स्थिती निवळेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट