मुसळधार पाऊस असो की कडाक्याची थंडी, पण ते मात्र अंधाऱ्या रात्री हाती टॉर्च घेऊन रुळाची तपासणी करीत असतात. गाडीतून प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या सुरक्षित प्रवासाठी रोजच आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांची प्रवाशांना माहितीही नसते. पण भारतीय रेल्वेत नियमित विशेषतः हिवाळा आणि पावसाळ्यात रात्री रुळांची तपासणी करण्यात येत असते.
शनिवारी पहाटे कानपूरजवळ राजेंद्र एक्स्प्रेसचे डबे घसरले आणि एका फटक्यात कितीतरी जणांचा बळी गेला. मात्र असे अपघात होऊ नये म्हणून रेल्वेच्या संबंधित विभागातर्फे रात्री पेट्रोलिंग केले जाते. रेल्वे रुळांची सुरक्षा धोक्यात येऊ नये आणि प्रवाशांना कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी वॉचमन, ट्रॅकमन, गँगमन आणि कीमॅन असतात. गँगमन रुळांखाली असणारे स्लीपर्सच्या देखभालीचे काम करतात, तर वॉचमन रेल्वे रुळांवर लक्ष ठेवून असतो. रात्रीच्या अंधारात हातात बॅटरी, खांद्यावर एक पिशवी घेऊन ते रुळामधून चालत जातात. पिशवीत लोखंडी अवजारे, तर दुसऱ्याच्या खांद्यावर मोठा हातोडा व लोखंडी पहार. रुळांच्या मधून जाताना रुळाच्या जोडावर बॅटरीचा प्रकाश टाकत ते पुढे जातात. जरा काही वावगं जाणवलं तर हातोड्याने रुळावर ठोकतात.
पावसाळा आला, की शेतीच्या कामांची धांदल उडते, तशी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रोज रात्री रेल्वे रुळांची काटेकोर तपासणी करण्याची रेल्वेची पद्धत आहे. गँगमन म्हणजे प्रत्यक्ष रेल्वे रुळावर काम करणारे कर्मचारी. जे काम आहे ते केवळ रुळांवरच. रुळांची देखभाल, खडीची भर घालणे, रूळ जोडणाऱ्या मोठ्या-मोठ्या नटबोल्टना तेलपाणी करणे, ते आवळणे व रात्रभर फिरून रुळांच्या अवस्थेवर नजर ठेवणे हे त्यांचे काम. रात्री बारा वाजता या गॅंगमनची ड्युटी सुरू होते. सभोवताली पूर्ण अंधार; पण रुळावरून ठरलेल्या वाटेने त्यांची पायपीट सुरू होते. परिस्थिती फारच बिघडली असेल तर जेथे धोका आहे त्याच्या अलीकडे-पलीकडे पन्नास-साठ मीटरवर रुळावर फटाके बांधले जातात. त्यावरून इंजिनाचे चाक जाताच त्याचा आवाज होतो. त्या आवाजाने लोको पायलटाला धोक्याचा इशारा मिळतो आणि गाडी थांबवली जाते. पावसाळ्यात रेल्वे मार्ग वाहून जाण्याचा धोका असतो तर हिवाळ्यात थंडीमुळे रुळांना भेगा पडण्याची शक्यता असते. या कर्मचाऱ्यांना आता वॉकीटॉकीही दिली जाते. धोका मोठा असेल तर त्याद्वारे जवळच्या स्टेशनशी संपर्क साधून ते धोक्याची माहिती देतात.
थंडीमुळे पडतात रुळांना भेगा
कडाक्याच्या थंडीत पोलादापासून बनलेल्या रुळांना भेगा पडण्याचे प्रकार घडतात व त्यातून रेल्वेचे भीषण अपघातही होऊ शकतात. रविवारी पहाटे कानपूरजवळ झालेल्या रेल्वे अपघातामागे हेदीखल एक कारण असू शकते, असे मध्य रेल्वेतील निवृत्त मुख्य लोको निरीक्षक एक्स.ई. राव यांनी ‘मटा’ला सांगितले. पावसाळा व हिवाळ्यात तसेही लोको पायलटला गाड्याचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना दिलेल्या असतात. रुळाला बारीक भेग असली की ती लगेच लक्षात येत नाही मात्र एखादी गाडी जाताना ती भेग वाढून डबे घसरण्याचे प्रकार घडू शकतात. कानपूरला नेमके काय झाले, तेथे रात्री पेट्रोलिंग झाले होते की नाही हे चौकशीत कळेलच, असेही राव यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट