ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांसोबतच विविध निर्णयांची इत्यंभूत माहिती मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सध्या बंद पडले आहे. त्यामुळे कोणतीही माहिती घेण्यासाठी नागरिकांना थेट सभापती किंवा अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ बंद असल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.
मिनी मंत्रालय अशी जिल्हा परिषदेची ओळख. ग्रामीण भागाशी घट्ट नाते असणाऱ्या या शासकीय यंत्रणेतील पाणीपुरवठा, समाजकल्याण, कृषी, पंचायत, सामान्य प्रशासन, आरोग्य, बांधकाम, पशुसंवर्धन, शिक्षण विभागांत गावकऱ्यांना कामे असतात. मात्र, जिल्हा परिषदेचे संकेतस्थळच दिसत नसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्ययावत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर यापूर्वी चुकीचा मजकूर दिसून येत होता.
अन्य जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची छायाचित्रे दिसायची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची छायाचित्रे अपलोड करण्यात आली नव्हती, योजनांची परिपूर्ण माहिती नाही, असे अर्धवट संकेतस्थळ बघावयास मिळायचे. यामुळे जिल्हा परिषदेच्या योजनांची चुकीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत होती. परिणामी, नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी भगत रुजू झाल्यानंतर संकेतस्थळात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमुलाग्र बदल करून लवकरच नवे संकेतस्थळ नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अजूनही संकेतस्थळ नव्याने तयार करण्यात आलेले नाही. जिल्हा परिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना बसत असून संकेतस्थळ कुठे नेऊन ठेवले, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
पूर्वसूचनेचा विसर
साधारणतः शासकीय संकेतस्थळांमध्ये दुरुस्ती, अपग्रेड करण्याचे काम करताना पूर्वसूचना देण्यात येते. मात्र, जिल्हा परिषदेने अशी कुठलीही माहिती दिलेली नाही. निदान संकेतस्थळ सुरू ठेवून 'पेज अंडर कस्ट्रक्शन' अशी माहिती देता आली असती. मात्र, याचाही विसर जिल्हा परिषदेला पडला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट