केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त अनेकांना दीर्घायुष्य लाभो हाच विचार ठेऊन नागपुरात मोफत आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले. वाढता वैद्यकीय खर्च आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांच्या आरोग्याची तपासणी मोफत करून त्यांना 'आरोग्यम धनसंपदेचे' महत्त्व पटवून देण्याची गरज आरोग्य शिबिरातून व्यक्त करण्यात आली.
गडकरी यांचा वाढदिवस शुक्रवार, २७ मे रोजी आहे. यानिमित्ताने दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शनिवार, २१ मेपासून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमीजवळील बीआरए मुंडले शालेत २७ मेपर्यंत शिबिर घेण्यात येणार आहे. उद्घाटनाला आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, संयोजक संदीप जोशी, सहसंयोजक प्रकाश भोयर, सचिन कारळकर, आशिष पाठक आदी उपस्थित होते. सकाळी १० ते दुपारी १ वाजतापर्यंत रुग्णांची नोंदणी करण्यात येईल.
सकाळी १० ते दुपारी ३ वाजतापर्यंत रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पहिल्या दिवशी ६३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. नेत्ररोग, अस्तिरोग, हृदयरोग, दंतरोग, मधुमेह यासारखे आजार असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घेतली. सर्वच रोगांच्या तपासण्या आणि शस्त्रक्रिया या शिबिरात करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शस्त्रक्रिया शुक्रवारी
शुक्रवार, २७ मे रोजी विविध तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. डॉ. अभय संचेती, डॉ. शरद हर्डीकर, डॉ. टी. पी. लहाने, डॉ. विकास महात्मे, डॉ. नटराजन, डॉ. अमित मायदेव या शिबिरात रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट