म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
बँकांमधून अद्याप पुरेशा प्रमाणात चलन मिळाले नसताना हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांना टोल नाके आणि पेट्रोलपंपांवर स्वीकारण्याची मुदत २४ नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून बंद होत आहे. त्यामुळे आता महामार्गांवरील सर्व टोलनाक्यांवर पूर्वीप्रमाणे टोल वसुली सुरू होणार असून पेट्रोलपंपांवरही आता नवे चलन द्यावे लागणार आहे.
हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नागरिकांना मोठा फटका बसला होता. त्यातून दिलासा देण्यासाठी केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाके आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इतर टोल नाक्यांवर वसुली बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे राज्य व देशातील सर्व महामार्गांवरील वाहतूक अत्यंत सुरळीतपणे सुरू राहिली. त्यात कोणताही अडथळा आला नाही. परंतु, आता ही मुदत २४ तारखेला संपणार आहे. त्यामुळे महामार्गांवरील वाहनचालकांना पुन्हा टोल नाक्यांवर पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, बँक व एटीएममधून अद्याप पुरेसे पैसे उपलब्ध होत नसल्याने महामार्गांवर रोख रक्कम आणि चिल्लर पैशांची चणचण निर्माण होण्याची भीती वाहतूकदार कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
रिझर्व्ह बँकेने आधी केवळ दोन हजाराच्या नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या होत्या. तर सोमवारपासून पाचशेच्या नोटा मिळणे सुरू झाले. तर दुसरीकडे शंभर व पन्नाच्या नोटाही पुरेशा संख्येत उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी पुरेसे चलन उपलब्ध नसताना टोल नाक्यांवर आता सुटे पैसे द्यावे लागणार आहे. नियमितपणे प्रवास करणाऱ्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, पेट्रोलपंपांवरही आता जुन्या नोटा स्वीकारणे बंद होणार आहे. अनेकांनी घरात उपलब्ध असलेल्या जुन्या नोटा केवळ पेट्रोल खरेदी करण्यासाठीच वापरल्या. सामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. बँकेत रांगेत उभे राहून नोट बदलून घेण्याएवजी पेट्रोल खरेदी करणे अनेकांनी पसंत केले होते. परंतु, ती सुविधादेखील बंद होणार असून शुक्रवारी त्याचा नेमका परिणाम दिसून येणार आहे.
--तिजोरी भरली, सुविधा बंद
महापालिकांचे विविध कर, वीज व पाणी देयके जुन्या नोटांनी स्वीकारण्याची मुदतही आता २४ तारखेपासून बंद होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय देयके भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील सर्वच महापालिकांच्या तिजोरीत अनेक कोटी जमा झालेत. तर राज्याच्या महसुली वसुलीवरही त्याचा अनुकूल परिणाम पडला होता. नागरिकांनी जुन्या नोटांद्वारे विविध थकबाकीही दूर केली होती. राज्यात सुमारे दीड हजार कोटींची वसूली ८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत झाली असल्याचा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. महावितरण कंपनीने सुमारे हजार कोटींची कमाई केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट