नागपूर हिवाळी अधिवेशन ५ डिसेंबरपासून सुरू होणार असून अधिवेशनाचा तयारी जोरात सुरू आहे. सभापती, उपसभापती, मंत्री, विरोधीपक्षनेते आदींना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. ‘आपल्याला हाच बंगला हवा,’ असा आग्रह मंत्र्यांकडून दरवर्षी करण्यात येतो. यंदा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना रविभवन येथील ९ क्रमांकाची कुटीर देण्यात आली, मात्र आपल्याला २१ क्रमांकाची कुटीर हवी असल्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशन आता तोंडावर आले आहे. रंगरंगोटीपासून इतर कामेही हाती घेण्यात आली आहे. अधिवेशनाला नागपुरात दाखल होणाऱ्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे जिकीरीचे कामही आता पूर्ण झाले आहे. कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला द्यावा याचा निर्णय नेमण्यात आलेली समिती घेते. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी बंगला राखीव असतो. उपमुख्यमंत्र्यांसाठीचा देवगिरी बंगला गेल्यावेळी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आला होता. खडसे यांनी यासाठी आग्रह धरला होता. यावेळी देवगिरी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मागच्या बाजूला असलेली २१ क्रमांकाची कुटीर आपल्याला द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
मंत्र्यांचे निवासस्थान
मंत्री निवासस्थान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामगिरी
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील देवगिरी
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता रविभवन कुटीर २
परिवहन मंत्री दिवाकर रावते रविभवन कुटीर ३
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा रविभवन कुटीर ४
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार रविभवन कुटीर ६
पर्यावरण मंत्री रामदास कदम रविभवन कुटीर ७
कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर रविभवन कुटीर ८
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे रविभवन कुटीर १
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे रविभवन कुटीर ९
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे रविभवन कुटीर १०
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविभवन कुटीर ५
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले रविभवन कुटीर २१
जलसंधारण मंत्री राम शिंदे रविभवन कुटीर २४
सहकार मंत्री सुभाष देशमुख रविभवन कुटीर २५
रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल रविभवन कुटीर २६
पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील निलंगेकर रविभवन कुटीर २७
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर रविभवन कुटीर २८
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट