नागपूरकरांना आरोग्याचा संदेश देण्यासाठी आणि माझी मेट्रो पर्यावरणपूरक असल्याचे पटवून देण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने रविवार, २७ नोव्हेंबर रोजी ‘माझी मेट्रो नागपूर मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ४ कि. मी., ६ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि.मी. अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून, ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग धावपटूंना प्रोत्साहन देतील.
अमरावती मार्गावरील एलआयटी महाविद्यालयात सकाळी साडेपाच वाजता नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते ९.३० पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. ऑरेंजसिटी रनर सोसायटी आणि सारस्वत विद्यालय अॅल्युम्नी असोसिएशनच्या सहयोगाने ही स्पर्धा होणार आहे. दिव्यांगांसाठी दीड किलोमिटरची स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
अॅथलेटिक्समध्ये जगभरात भारताचा दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग या स्पर्धेला पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. धावूनच ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले, तो मिल्खा सिंग नागपूरकरांना सुदृढ आरोग्यासाठी धावताना पाहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मॅरेथॉन आटोपल्यानंतर सकाळी ९.३० वाजता एलआयटी कॉलेजमध्ये बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित राहणार आहेत.
मॅरेथॉनचा मार्ग
४ कि.मी. : एलआयटी कॉलेज, रामनगर, लक्ष्मीभुवन, लॉ कॉलेज, रविनगर, भारतनगर, एलआयटी कॉलेज.
६ कि.मी. : एलआयटी कॉलेज, रामनगर, व्हीएनआयटी मागचे गेट, एलएडी कॉलेज चौक, शंकरनगर, लक्ष्मीभुवन, लॉ कॉलेज चौक, रविनगर चौक, एलआयटी कॉलेज.
१० कि.मी. : एललायटी कॉलेज, रामनगर, एलएडी कॉलेज चौक, व्हीएनआयटी, अभ्यंकरनगर चौक, माटे चौक, जेरील लॉन, बजाजनगर, लक्ष्मीभुवन चौक, रविनगर चौक, एलआयटी कॉलेज.
२१ कि.मी. : एलआयटी कॉलेज, फुटाळा टी पॉइंट, वायुसेनानगर, व्हेटर्निटी कॉलेज, सेंटर पॉइंट स्कूल, जुने व्हीसीए स्टेडियम, बोले पेट्रोलपंप, शंकरनगर चौक, लक्ष्मीनगर चौक, जेरील लॉन, अभ्यंकरनगर चौक, तिडके जंक्शन, रविनगर चौक, एलआयटी कॉलेज.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट