ढगाळ वातावरणामुळे ओसरलेली उष्णतेची लाट पूर्व विदर्भात पुन्हा आली आहे. यामुळे नागपूरचा पारा बुधवारी ४५.८ अंशांवर गेला. हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले. येत्या दोन दिवस ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरण आणि मान्सूनपूर्व वाऱ्यांच्या हलक्या चाहुलीमुळे विदर्भातील उष्णतेची लाट आठवडाभरापासून ओसरलेली होती. ४६.६ अंशांचा पारा टप्प्याटप्प्याने खाली येत काही काळ ४४ अंशांदरम्यान स्थिरावला. त्यानंतर पाऱ्यात घट होऊन तो ४२ अंशांपर्यंत उतरला होता, मात्र, बुधवारी पाऱ्यात अचानक मोठी वाढ झाली.
नागपूर शहर आणि परिसरात बुधवार सकाळपासूनच ऊन तापले होते. उन्हाच्या गरम झळा सकाळी ११ वाजतापासूनच सुरू होत्या. यामुळे पारा तापणार अशी चिन्हे होतीच. दुपारी ऊन आणखी तापले. यामुळे कमाल पारा ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला. हा सरासरीपेक्षा तब्बल चार अंश अधिक राहिल्याने देशातील ते सर्वाधिक तापमान ठरले. नागपूरपाठोपाठ वर्धेत ४५.५, तर चंद्रपुरात ४४.८ अंशांची नोंद करण्यात आली. सुदैवाने उष्णतेची लाट सध्या केवळ पूर्व विदर्भात आहे. विदर्भाच्या अन्य भागात पारा ४० ते ४२ अंशांदरम्यान असला, तरी सरासरीइतकाच आहे. येथील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मान्सूनच्या हालचाली थंडावल्या असल्याचे पाऱ्यात वाढ झाली आहे. तरिही मान्सूनच्या आधी अशाप्रकारे पाऱ्यात वाढ होतच असते. मान्सूनच्या आधीची ही अखेरची उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. पाऱ्यातील ही वाढ पुढील दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पारा हळूहळू कमी होत जाईल. सोबतच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन सायंकाळच्या सुमारास वातावरण ढगाळ होऊन वादळ-वाऱ्यासह पावसाचा अंदाजदेखील आहे.
मान्सून पुढे सरकणार अंदमानाच्या समुद्रातच अडकून पडलेला मान्सून दोन दिवसांत पुढे सरकण्याची दिलासादायी स्थिती निर्माण झाली आहे. हा मान्सून सुरुवातीला बंगालच्या उपसागरात व त्यानंतर लवकरच केरळमध्ये धडकेल. केरळमध्ये मान्सून आला की विदर्भात पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली सुरू होतील. मात्र, तोपर्यंत पारा तापण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट