म.टा.प्रतिनिधी, चंद्रपूर
दारूमुक्तीचे प्रयत्न जारी असून त्याचाच एक भाग म्हणून आता जिल्ह्यातील १८ ठिकाणी अवैध दारू रोखण्यासाठी सर्व्हिलन्स स्टॅटिक टीम (चौकी) उभारण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून त्यास बहुतांश ठिकाणी यास प्रारंभ देखील झाला आहे. हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून यामुळे अवैध दारूला रोखण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
दारूबंदीविरोधातील लोकलढ्यापुढे नमते राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली. जिल्ह्यातील महिलांचा याबाबत सुरू असलेला लढा यशस्वी झाला. अखेर चंद्रपूर जिल्ह्यात बाटली आडवी झाली. वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर दारूमुक्त झोन झाला. साडेचार वर्षांच्या लोकसंघर्षाला यश आले. जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. चंद्रपूर हा राज्यातला तिसरा जिल्हा ठरला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करताना मागील वर्षभरात दारूबंदीचे सुमारे साडेसहा हजारांहून जास्त गुन्हे दाखल झाले असून दीड लाखांहून जास्त लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. तेव्हा जिल्ह्यात येणारी अवैध दारू रोखणे गरजेचे होते. आता जिल्ह्यातील १८ ठिकाणी अवैध दारू रोखण्यासाठी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (चौकी) उभारण्यात येत आहे. यात एक पोलिस उपनिरीक्षक, एक पोलिस हवालदार व चार पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
चंद्रपूर पोलिस प्रशासनांतर्गत येणाऱ्या राजुरा, गडचांदूर, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल या उपविभागात एसएसटी पॉइंट उभे केले जाणार आहे. जिल्हा दारुमुक्त होण्यासाठी दुसऱ्या संलग्न जिल्ह्यामधून तसेच राज्यामधून अवैध मार्गाने येणारी दारू रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने १८ युनिट तयार केले असून शहरात प्रवेश करणाऱ्या १८ प्रमुख प्रवेशद्वारावर नजर ठेवली जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्व चौक्या सीसीटीव्ही कॅमेराच्या रडारवर असणार आहेत. पोलिसांच्या या निर्णयामुळे आणखी काही प्रमाणात दारूचा अवैध पुरवठा रोखता येईल असे मानले जात आहे. बहुतांश ठिकाणी प्रारंभ देखील झाला आहे. काही ठिकाणी चौकी उभारण्याचे काम जारी आहे. नुकतीच पदभरती झालेले सध्या प्रशिक्षणासाठी गेले असून त्यांनंतर ते याच ठिकाणी रुजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी 'मटा'शी बोलताना दिली.
येथे असतील चौक्या राजुरा उपविभागातील लक्कडकोट, आंबेडकर चौक, मूल रोड चौक, कोठारी बसस्थानक, गडचांदूर उपविभागांतर्गत कोठोडा, नागार्जुना चौक, चंद्रपूर उपविभागांतर्गत नकोडा, बेलोरा, बामणी फाटा, वरोरा उपविभागांतर्गत पाटाळा, आनंदवन चौक, ब्रह्मपुरी उपविभागांतर्गत टाकाफाटा, कांपा टेम्पा, बामणी, तरेगाव वडसा रोड, गांगलवाडी तर मूल उपविभागांतर्गत चांदापूर फाटा, सिंदेवाही येथील शिवाजी चौक अशा एकूण १८ चौक्याचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट