mandar.moroney@timesgroup.com
ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील चार वाघांना रेडिओ कॉलर लावण्याच्या प्रयत्नांमध्ये वाघांनी लपंडाव केल्याने अडथळा निर्माण झाला. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात या वनक्षेत्रातील वाघ योग्य टप्प्यात न आल्याने रेडिओे कॉलर लावण्याचे प्रयत्न पहिल्या दिवशी यशस्वी होऊ शकले नाहीत.
वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि वन विभागाच्या वतीने ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील चार ते पाच वाघांना रेडिओ कॉलर लावण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले. आपल्या आईपासून विभक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांना रेडिओ कॉलर लावली जाणार आहे. सामान्यतः व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांना कॉलर लावली जाते. मात्र, प्रादेशिक वनवृत्तातील वाघांना कॉलर लावण्याचा वेगळा प्रयत्न ब्रह्मपुरी वन विभागात करण्यात येत आहे. याआधी चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी असा प्रयोग करण्यात आला होता.
वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे वैज्ञानिक बिलाल हबीब यांच्या नेतृत्वात आज रेडिओ कॉलरची मोहीम राबविण्यात आली. या चमूने गुरुवारी सकाळी आपल्या कामाला प्रारंभ केला. मात्र, संपूर्ण दिवसभर या चमूचा वाघांशी लपंडाव सुरू होता. या चमूला वाघांचे दर्शन झाले तरीही त्यांना ट्रँक्विलाईजरच्या साहाय्याने नियंत्रणात आणणे मात्र शक्य झाले नाही. त्यामुळे, मोहिमेच्या पहिल्या दिवशी रेडिओ कॉलर लावण्यात तज्ज्ञ्यांच्या या चमूला यश येऊ शकले नाही.
वाघांच्या भ्रमणमार्गाचा माग काढण्यासाठी तसेच त्यांच्या अधिवासाच्या जागा निश्चित करण्यासाठी रेडिओ कॉलर लावली जाते. त्यानुसार, वन व्यवस्थापनाबाबतचे निर्णय घेणे वन विभागाला शक्य होते. त्यामुळे, रेडिओ कॉलर लावण्याचा प्रयोग महत्वाचा समजला जातो. सध्या ब्रह्मपुरी येथे होत असलेला प्रयोग येत्या काळात चंद्रपूरच्या इतरही भागात केला जाण्याची शक्यता आहे.
वाघांना रेडिओ कॉलर लावणे गुरुवारी शक्य झाले नसले तरी तज्ज्ञ चमूला त्यांचा माग काढण्यात यश आले आहे. शुक्रवारी सकाळी लवकरच या कामाला पुन्हा सुरूवात केली जाईल. चार ते पाच वाघांना रेडिओ कॉलर लावण्याचा प्रयत्न या मोहिमेत केला जाणार आहे, अशी माहिती चंद्रपूर प्रादेशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट