७ जुलै, २००९ मध्ये नाग नदीला मोठा पूर आला होता. या पुरात सीताबर्डी प्रभाग क्र.२६ येथील कुंभारटोलीतील निवासी सुरेश राऊत यांचा एकुलता एक पुत्र प्रकाश राऊत वाहून गेला होता. शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. अखेर दोन दिवसानंतर कामठी तालुक्यातील आसोली येथील नाल्यात त्याचा मृतदेह सापडला होता. यानंतर राऊत कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रभागाचे तेव्हाचे नगरसेवक संजय हेजीब यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तीन जिल्हाधिकारी बदललेत. जिल्हाधिकारी कार्यलयाकडील मदत व पुनर्वसन विभागाकडे या प्रस्तावाचा फॉलोअप घेण्यात आला. पण, कोणतेही ठोस उत्तर दिले जात नव्हते. त्यानंतर स्वत: हेजीब यांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविलेल्या प्रस्तावाबाबतही सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाची दखल घेत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयास निर्देश दिले. नव्याने हालचाली सुरू करून नव्याने प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला. अखेर मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निधीतून १ लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश राऊत कुटुंबीयांना सुपूर्द केला. नैसर्गिक संकटामुळे जीव गमावलेल्या राऊत यांच्या कुटुंबीयांप्रमाणे इतरही कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयातील गलथानपणाचे बळी पडत आहेत.
जरीपटका भागात गेल्यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याशेजारी असलेल्या झोपडपट्टीतील एक झोपडी तुटून पुरात वाहून गेली. त्या घटनेत आजीचा मृतदेह सापडला. मात्र, नातू वाहून गेला. याप्रकरणातही अद्याप कुठलीच मदत करण्यात आली नाही, अशी माहिती आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट