आजाराने खचलेल्या रुग्णांसाठी उपचाराइतकेच सुशृषेला महत्त्व असते. त्यामुळेच परिचारिकांना रुग्णसेवेच्या पाठीचा कणा म्हटले जाते. ही सेवा करण्यासाठी परिचारिकांना वेळोवेळी सूचना करणे, स्वतःहून त्यासाठी पुढाकार घेणे, असे परिचारिका अधीक्षिकांंचे कर्तव्य असते. परंतु, मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालय याला अपवाद असल्याचे वास्तव आहे. गेल्या सहा वर्षांपासून येथे परिचारिका अधिक्षीकांचे पदच रिक्त आहे. त्यामुळे नर्सेसवर कोणाचेही नियंत्रण नाही, अशी स्थिती उद्भवली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सहा वर्षांपूर्वी येथील अधीक्षिकांची बदली झाली. तेव्हापासून त्यांच्या बदलीसोबत त्यांचे पदही गायब झाल्याचा अफलातून प्रकार निदर्शनास आला आहे.
अधीक्षिकांंसोबतच येथील सॅनिटरी इन्स्पेक्टर अर्थात स्वच्छता निरीक्षकाची जागाही रिक्त आहे. त्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन लावणार कोण आणि सुपरमधील स्वच्छतेच्या कामावर देखरेख ठेवणार कोण, असा प्रश्न उभा ठाकला आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील परिचर्या अधिक्षीका पंदेरकर यांची सहा वर्षांपूर्वी २०१०मध्ये मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर येथे अधीक्षिका पद भरणे अपेक्षित होते. मात्र, या बदलीसोबत त्यांचे पदही गायब करण्यात आले. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून सहाय्यक परिचर्या अधीक्षिकांवरच येथील कामाचा डोलारा आहे.
खरी गरज मनुष्यबळाच्या डोसची एकूण २३० खाटांची क्षमता असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सध्या विविध वर्गातील ३३६ पदे भरण्यात आली आहेत. तर आणखी ४७ पदे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. भरलेल्या पदांमध्ये प्रामुख्याने वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१, वर्ग दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३०, तृतीय श्रेणीची ६३, तृतीय श्रेणी नर्सिंगची १६२, तर चतुर्थश्रेणीच्या ५८ पदांचा समावेश आहे. रिक्त पदांमध्ये अनुक्रमे वर्ग-१चे ७, वर्ग-१चे ९, तृतीय श्रेणीची ६, नर्सिंगची १६, तर चतुर्थश्रेणीची ९ अशी एकूण ४७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या यंत्रणेचा डोलारा सांभाळायचा कसा, असा पेच प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट