रिपाइं (आठवले)चे अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांना जोवर केंद्रात मंत्रिपद मिळत नाही, तोवर राज्यात विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारायची नाही, असा ठराव शनिवारी रविभवन येथे विदर्भातील प्रमुख पक्षकार्यकर्त्याच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर होते. विधानपरिषदेची संधी हुकली वा भाजपने अन्याय केल्याची ओरड सुरू असतानाच, पक्षात मतभिन्नता असली, तरी आठवलेंना मंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. पक्षातर्फे ही सारवासारव वा स्वत:ची मनधरणी करून घेण्यात येत असली, तरी पक्षात आता विदर्भ आणि मुंबई असे दोन गट तयार झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. तरीही, चळवळीतील कार्यकर्ते म्हणून आठवलेंच्या पाठीशी भक्कमपणे पुढे राहण्याचा मनोदयही यावेळी व्यक्त करण्यात आला.
थुलकर म्हणाले, 'आठवले यांना केंद्रात मंत्रिपद तसेच राज्यात पक्षाला विधानपरिषद सदस्यत्व देण्यासंदर्भात निवडणुकीदरम्यान करार झाला होता. परंतु, या कराराची अंमलबजावणी दोन वर्षे उलटल्यानंतरही झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष, नाराजी व राग असणे स्वाभाविक आहे. मात्र, जेव्हा पक्षाला पद मिळण्याची वेळ आली, तेव्हा आठवलेंचा विचार सर्व पक्षांनी केला आहे. त्यात आठवलेंना केंद्रात मंत्रीपद मिळावे, यास सर्वोत्तम प्राधान्य आहे. ही संधी मिळत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळेच कार्यकर्त्यांनी आठवले यांना मंत्री करण्याची मोहीम उघडली आहे. आधी आठवले यांना मंत्री करा, त्यानंतरच विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व अशी भूमिका घेण्यात आली आहे. थुलकर यांनी या दोन्ही मुद्यावरून रिपाइंत फूट पडत असल्याचे फेटाळले. बैठकीला विदर्भातील नेते भीमराव बनसोड, आर. एस. वानखेडे, अशोक मेश्राम, दुर्वास चौधरी, डॉ. मनोज मेश्राम, डॉ. भीमराव मस्के, संघटन मंत्री राजन वाघमारे, भीमराव कांबळे, युव आघाडीचे शहराध्यक्ष विनोद थूल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग रचनेविरुद्ध न्यायालयात जाणार
बहुसदस्यीय प्रभाग रचनेला पक्षाने विरोध दर्शविला आहे. प्रभाग पद्धतीमुळे निवडणूक गरिबांची न राहता श्रीमंतांची ठरेल. चार नगरसेवकांच्या प्रभागामुळे विकासावर मर्यादा पडतील. त्यामुळे रिपाइंतर्फे विरोध करण्यात आला असून याविरोधात पक्ष न्यायालयात जाणार आहे. यासाठी मुंबईचे अॅड. डी. के. बर्वे याविरुद्ध रिपाइंतर्फे न्यायालयात लढणार आहेत. सोबतच बुलडाण्यातील नगरसेवक दंदे यांनीही याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे न्यायालयात गेल्यास त्यांना सहकार्य करण्याची भूमिकाही पक्ष घेईल, असे थुलकर म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट