म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या कराचीतील दूरध्वनीवरून राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क करण्यात आल्याच्या आरोपाने राज्यात खळबळ माजली आहे. पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी मात्र 'दाऊद पाकिस्तानात आहेच कुठे?' असा सवाल केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नागपूर दौऱ्यावर असलेल्या बासित यांनी शनिवारी नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याच्या वृत्ताचा ठाम शब्दांत इन्कार केला... 'दाऊद पाकिस्तानात आहेच कुठे?' असा प्रतिप्रश्नच उपस्थितांना केला.
पाकिस्तानची बाजू भक्कमपणे मांडत चर्चेसाठी उत्सुक असल्याचे संकेतही बासित यांनी दिले. 'भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धातून शांती येऊ शकत नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो. त्यामुळे भारताने कुठल्याही पूर्वअटी न लादता चर्चा सुरू करावी. आम्ही प्रतीक्षा करत आहोत,' असे ते म्हणाले.
दोन्हीही देशांमध्ये कायद्येविषयपद्धत समान आहे. भारतीय न्यायालयांतील अनेक महत्त्वपूर्ण निकालांचा पाकिस्तानमधील प्रकरणांमध्ये आधार घेण्यात आला आहे. उभय देशांतील वकिलांनी एकत्र येऊन संवाद साधल्यास त्यातून त्यांना आणखी काही शिकता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानला अनेक अंतर्गत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दारिद्र्य, आरोग्यसेवा, साक्षरता यासह दहशतवाद ही सर्वात मोठी समस्या आहे. पाकिस्तान गेल्या ३५ वर्षांपासून दहशतवादाविरुद्ध लढा देत आहे. दोन वर्षात दहशतवाद कमी झाला आहे, दावा बासित यांनी केला.
पठाणकोट हल्ल्याबाबत दोन्ही देशांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी पाकिस्तानचे नाव हल्ल्याबाबत गोवण्यात येऊ नये, असे अप्रत्यक्षपणे सुचवले. पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र असून अल्पसंख्याकांवर अन्याय, अत्याचार होत असल्याचा बासित यांनी इन्कार केला. अल्पसंख्याक हिंदू किंवा ख्रिश्चनांवर अन्याय होत नाही. लष्कर, विदेश सेवेत आमच्या खांद्याला खांदा लावून हिंदू कर्तव्य बजावतात. भारतीय नागरिकत्वाची मागणी केल्याची माहिती चुकीची असल्याचे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, सरचिटणीस अनुपम सोनी उपस्थित होते. तर संवाद कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती, काकासाहेब तुमाणे, विदर्भ साहित्य संघाचे श्रीपाद भालचंद्र जोशी, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, मेघनाद बोधनकर, टी. बी. गोल्हर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर, नितीन रोंघे, मोहन पांडे, युवराज पडोळे, धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट