म.टा. प्रतिनिधी, नागपूर
जेवण केलं का, औषध वेळेत घ्या, बाहेर उन्हात फिरायला जाऊ नका हं, ऊन लागेल, काही लागलं तर सांगा, जागरण करू नका, तुमच्यासाठी येताना काय आणू... आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांच्या अंतःकरणातून आलेल्या या प्रश्नांचा हा भडिमार...! ऊन-सावलीसारखा तो आपल्या मुलांच्या सोबतीला होता. आता वडिलांचे हात थरथरत आहेत. वाढलेल्या वयामुळे शरीर थकले. अशा या म्हातारपणातील बालपणाच्या अवस्थेत मुले वडिलांच्या भूमिकेत आले असून, ही पिले आता प्रेमाची परतफेड प्रेमानेच करीत असल्याच्या भावना नागपुरातील अनेक ज्येष्ठांनी बोलून दाखविल्या.
म्हातारपणात पालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांचीच चर्चा अधिक होताना दिसते. मात्र, वडिलांच्या भूमिकेत येऊन पालकांवर जीवापाड प्रेम करणारी मुलेही मोठ्या प्रमाणात आहेत. वडील होऊन ते आपल्या पालकांचे सर्व हट्ट पुरवीत असतात. ऑफिसमधून येताना पालकांच्या आवडीचा मेन्यू घेऊन येतात. आरोग्याची काळजी घेतली नाही तर पालकांप्रमाणे रागवून आपल्या प्रेमाची पावतीही देतात.
आमचा मुलगाच आता आमच्यासाठी बाप झाला असून, तोच आमचा आधारवड बनला असल्याचे या पालकांनी 'मटा'शी बोलताना अभिमानाने सांगितले. माझी खाण्याची हौस भागविण्यापासून सर्व गरजा मुलगा भागवीत असल्याचे मानकापूर येथे राहणारे मनोहर मुसळे यांनी सांगितले.
मुलींना मुलाप्रमाणे वागविणाऱ्या कमलाकर श्रोते यांच्या मुली आता त्यांच्यासाठी माता-पित्याच्या भूमिकेत असून त्यांची संपू्र्ण काळजी घेतात. वयानुसार चालता येत नाही, गाडी सुरू करता येत नाही तेव्हा मुलगी धावत येऊन गाडीची किक मारून देते असेही श्रोते अभिमानाने सांगतात. आयुष्याच्या सुख-दुःखात आपल्या पाठीशी असलेल्या मुलांचे कौतुक करताना प्रभाकर निमगडे आणि वीरेंद्र गांधीही भावूक झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट