अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नागपुरतील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजला शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ पासून मान्यता दिली आहे. तर नागपूर विद्यापीठानेही प्रथम संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे केंद्रिय प्रवेश प्रक्रियेतदेखील येथील इंजिनीअरिंग कॉलेजचा समावेश आता होणार आहे. त्यासोबतच येथील कॉलेजकरिता २१ शिक्षक, १९ प्रशासकीय आणि ३३ शिक्षकेतर अशा ७३ पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात आला होता. तेव्हा समितीने २०१६ आणि त्यापुढील शैक्षणिक सत्रांकरिता ६२ शिक्षक, ४० प्रशासकीय आणि ६१ शिक्षकेतर अशा एकूण १६३ पद निर्मितीला मान्यता दिली आहे. ही पदे येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यात येणार आहेत. यावर्षी पहिल्या टप्प्यात प्रथम वर्षाला आवश्यक असणारी ७३ पदे भरण्यात येणार आहेत. त्यात प्राधान्याने कॉलेजचे प्राचार्य, एक प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक आणि १४ सहायक प्राध्यापकांचा समावेश आहे.
दरम्यान, एआयसीटीईने चंद्रपूर येथील शासकीय इंजिनीअरिग कॉलेजमध्ये सिव्हिल, अॅटोमिक एनर्जी आणि टेलिकम्युनिकेशन या तीन ब्रान्चेसमध्ये प्रत्येकी ६० प्रवेशक्षमतांना मान्यता दिली आहे. नव्या शैक्षणिक सत्रात त्यात तीनही ब्रान्चना प्रवेश देण्यात येणार आहेत. त्याकरिता ५३ शिक्षकांची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावालादेखील मान्यता देण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट